आपल्या आयुष्यातून एखादी गोष्ट निसटत आहे किंवा आपल्याला सोडून दूर जात आहे, असं लक्षात आलं की, त्या गोष्टीची किंमत कळते, असं का होतं...? जो पर्यंत ती आपल्या सोबत असते तो पर्यंत तिचं महत्त्व समजत नाही. आपल्याबरोबर असेपर्यंत आपण नेहमीच तिला फक्त गृहीत धरत असतो. पण ज्या क्षणी ती आपल्याजवळ नसते, तेव्हा आपण तिच्या अस्तित्वासाठी धडपडू लागतो. तिचा सहवास मिळविण्यासाठी कासाविस होतो, आतूर होतो. त्या क्षणी आपल्याला त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व आणि त्याची आपल्यासाठी असलेली गरज समजायला लागते. आणि कदाचित हे समजायला उशिर झालेला असतो. पण हे सगळं ती व्यक्ती आपल्यासोबत असे पर्यंत का नाही समजू शकत...? हे अस्तित्व आपल्यापासून दूर जाऊ लागलं की मनातलं रितेपण समोर येऊ लागतं. `जैसे जिंदगी किसी मोड पे थम सी गयी हो...दूर दूर तक शायद कोई चिराग भी नजर न आए..`
रोज सकाळी मोबाईलवर वाजणारा गुड माॅर्निंगचा मिस्ड काॅल.. असेल, गुड नाइटचा मेसेज असेल किंवा आजचा दिवस कसा गेला हे विचारणारा एखादा मेसेज असेल.. रोजच्या सवयीतले असे फोन आणि मेसेज चार दिवस जरी आपल्या मोबाईवर येऊन आदळले नाहीत, तर मन बैचेन होतं. मेसेजची किंवा फोनची वाट पहात अस्वस्थ होत राहातं. जोपर्यंत ते फोन येत असतात, गप्पा होत राहतात, रोज भेट होत राहते, त्यात वेगळं असं काहीच वाटत नाही. तोपर्यंत समजत नाही की आयुष्यातला हा प्रत्येक क्षण आपल्यासाठी किती मौल्यवान आहे. आणि या क्षणामुळे आपलं आयुष्य किती सुंदर आणि अर्थपूर्ण होत जातंय..
रोज फक्त रूटीन म्हणून वाटणाऱ्या या गोष्टी अचानक एखाद्या दिवशी घडत नाहीत... आपण मात्र नेहमीच्या वेळेत हे सारे घडेल म्हणून वाट पहात राहतो... हजारवेळा मोबाईल तपासत राहतो. खरंतर आपला मोबाईल त्या एखाद्या फोनसाठी किंवा मेसेजसाठी वाजत नाही, याला कारणंही खूप असतात. रेंज, बॅटरी डाऊन, रिचार्ज फेल... अशी कितीतरी असू शकतात. पण जेव्हा वाट पाहण्याची वेळ असते, तेव्हा अशा काही गोष्टी लक्षातही येत नाहीत. आणि त्या माणसाचं अचानकपणे आपल्या आयुष्यातलं महत्त्व वाढायला लागतं.. तो नसल्याची जाणीव होत राहते आणि मग समजतं.. की काही गोष्टी आपल्या आसपास असणं, त्यांनी आपल्या मनात डोकावणं.. मनात घर करणं किती महत्त्वाचं असतं.. आणि त्यांचं असणं आपलं आयुष्य किती सुंदर करतं.. पुन्हा एकदा समजतं, की जगण्यावर प्रेम करणं किती महत्त्वाचं असतं.. कारण, या जगण्यातून मिळालेला प्रत्येक क्षण अन् क्षण, कण अन् कण आपल्याला वलयांकित करणारा आहे. आयुष्यातल्या प्रत्येक दिवसाला सोनेरी पंखांनी सजविणारा आहे. अवघड मार्गांवर सोपे वळण बनून आपल्याला मदतीचा हात देणारा आहे. तो हातातून निसटून गेल्यानंतर, कसा होता हे आठवण्यापेक्षा तो हातात आहे आणि जवळ आहे तोपर्यंतच `पल पल दिल के पास`.. अनुभवता येतो...
सीमा शेख
शुक्रवार, सात डिसेंबर २०१२
सकाळी ९.३०
No comments:
Post a Comment