Wednesday, 19 December 2012

मी आणि निळाशार तो..


प्रेम.. दिवसेंदिवस बहरणारं.. फुलणारं.. खुलणारं..असतं आणि ठराविक एका काळानंतर ते खूप समजुतदार होत जातं. मॅच्युअर होतं. एकमेकांत कितीही रुसवे फुगवे झाले तरी चटकन सगळं विसरून एकमेकांना समजून घेणारं आणि चुका मान्य करून पुन्हा नव्यानं नातं खुलविणारं असतं. समुद्रावरचं माझं प्रेमही असंच खूप मॅच्युअर झालंय, असं वाटलं या वेळेस.. समुद्राच्या लाटांवर खेळणं, पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेणं.. असं बरंच काही ठरवलेलं असतानाही प्रत्यक्ष किनाऱ्यावरून समुद्रापर्यंत चालत जाताना काही क्षणात ही मनसुबे विरघळून गेले. 

पायातून चप्पल काढली आणि समुद्राच्या ओल्या, मऊ वाळूचा तळपायांना स्पर्श होताच वेगळंच वाटलं. त्याच्यावरच्या ज्या प्रेमाखातर इतका लांबचा प्रवास केला होता, तो क्षीण क्षणार्धात नाहीसा झाला.. आणि त्याच्याशी खूप भरभरून गप्पा माराव्याशा वाटल्या. त्याला जाणून घ्यावंसं वाटलं. आतापर्यंत खाऱ्या पाण्याचा जलाशय म्हणूनच याच्याकडे पाहिलं. त्याच्या अंतरंगात शिरण्याचा, त्याचं मन जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. पण या वेळी असं वाटलं की, आता याला अनुभवायचं. पण या पाण्यात न खेळता.. फक्त याच्या काठावरच्या वाळूवरून चालत..त्याच्याशी मनातलं सगळं शेअर करत आणि त्याच्या मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करीत.

लोक फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी आणि आपला क्षीण घालविण्यासाठीच इथे येतात. खूप थकल्यानंतर, कामात बदल हवासा वाटल्यानंतरच सागराकडे धाव घ्यावीशी वाटते. कारण तो वरवर कितीही खारा वाटला तरी त्याच्या अंतरंगातला स्वच्छपणा, निरागसता कोणाकडेच नाही. मोठ्यांनाही लहान मूल होऊन खेळायला लावणारा हा सागर... इथे येणाऱ्याला फक्त आनंद देण्याचं कर्तव्य  करतो. त्याचे श्रम, कष्ट हिरावून घेतो. याच्याकडून खूप काही शिकण्यासारखंही आहे. निसर्गाची निर्मिती झाल्यापासून या समुद्राचं एकच काम उसळायचं.. लाटा निर्माण कराच्या, किनाऱ्यावर येऊन धडकायचं आणि पुन्हा तेवढीच पावलं मागे सरकायचं..

शहरात राहणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला कायम वाटत असतं, हा समुद्रकिनारा आपल्या घराजवळ का नाही ? याचं उत्तरही अगदी साधं आहे. जी गोष्ट आपल्या जवळ कधीच राहू शकत नाही, तिच्याबद्दलची ओढ, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आत्मीयता आपल्याला इतरांपेक्षा काकणभर जास्तच असते. म्हणूनच तर समुद्रावर आपण नदीपेक्षाही जास्त प्रेम करतो. आता असंच निरपेक्ष प्रेम कायम करत राहायचं, असं मी ठरवलं. समुद्राच्या ओल्या वाळूत पायाचे ठसे उमटविणं, वाळूचं घर करणं, किनाऱ्यावरील वाळूत मनातलं बरंच काहीसं कोरत राहणं, हा आनंदच वेगळा असतो. आणि माझ्यादृष्टीने समुद्रावरचं प्रेम यातच आहे. त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता, त्याच्यावर मात्र आयुष्यभर मनापासून प्रेम करत राहणं... आता कायमचंच.. असा हा सुंदर, नितांत जवळचा आणि लक्षलक्ष आठवणींचा साठा जपणारा समुद्र मनात नेहमीच गूढ घर करून राहतो..
                         उसळती हृदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा...
                         तू किनाऱ्यासारखा परि कोरडा उरलास का रे...
                         राजसा निजलास का रे...
गझलकार सुरेश भट यांची ही गझल आणि त्यातला शब्द अन् शब्द इतका समर्पक वाटतो. त्यामुळे मी या ओळींवर नेहमीच खूप प्रेम केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलाही अजूनही न उलगडलेलं कोडं...या सागरात कित्येक लाटा अखंड उसळत असताना किनारा मात्र कायमच कोरडा कसा काय ?
  
 सीमा शेख 
१९ डिसेंबर २०१२
दुपारी २.३०

No comments: