Tuesday, 8 April 2014

मेरी आवाज ही पहचान है...


१५ जानेवारी २०१४... चा दिवस. आकाशवाणीतून बाहेर पडताना एन्ट्री रजिस्टरमध्ये सकाळी साडेनऊ वाजता निघतानाची नोंद केली आणि त्याक्षणी हातातलं पेन थोडं जड झालं. गेली साधारण दहा वर्षं या ठिकाणी निर्माण झालेलं आवाजाशी नातं आता संपणार होतं. अर्थात काही दिवसांच्या खंडानंतर  ते पुन्हा जोडलं देखील गेलं असतं, पण आता जेव्हा जोडलं जाईल, तेव्हा माझी ओळख बदललेली असेल. आवाज तोच असला तरी आतापर्यंत ज्या नावामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखत होता, त्यात नक्कीच बदल झालेला असेल.



पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक बातम्यांसाठी सीमा शेख हे नाव खूप परिचित झालेलं होतं. प्रकर्षानं नाव आणि आडनाव यामुळे लोकांच्या ते जास्तच चांगलं लक्षात रहात होतं. गेली अनेक वर्षं या नावाचं आणि आवाजाचं लोकांनी कौतुकही केलं. तेव्हाच खरंतर या आवाजाचं महत्त्व समजलं. अजूनही आठवतोय, आकाशवाणीतला पहिला दिवस. युववाणीसाठी काम करायचं म्हणून विभागप्रमुख प्रतिमा कुलकर्णी यांना भेटायला गेले होते. त्यांचा सहकारी आणि कालांतराने माझ्या चांगल्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या अमोल जोशी याच्याशी आधी भेट झाली. तो मला स्टुडिओमध्ये घेऊन गेला. दोन भली मोठ्ठी दारं उघडून स्टुडिओमध्ये प्रवेश करणं माझ्यासाठी अवघडच होतं. प्रतिमा मॅडम एका कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करत होत्या. परदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाषेबद्दलचे अनुभव आणि भाषेची आवड यासंदर्भातला कार्यक्रम होत्या. मी एस.पी. कॉलेजमध्ये तेव्हा अकरावीत शिकत असेन. मी जर्मनचा अभ्यास करत होते. माझ्याशी बोलताना हे समजल्यावर त्या म्हणाल्या, वा..छानच...मी याच विषयावर काम करते आहे. चल, जा समोर स्टुडिओमध्ये. तुझे अनुभव रेकॉर्ड करू. म्हणजे, व्हॉइस क्वालिटी समजेल. स्टुडिओतला माझा पहिला अनुभव. खूप छान होता आणि तो ओके झाला. माझ्या बाइटनंतर माझं आवडतं गाण कोणतं म्हणून विचारण्यात आलं. आशाताईंची गझल ऐकवा म्हणून सांगितलं. सलोना सा सजन है.. और मै हूं... ही गझल लावण्यात आली. ऑन एअरसुद्धा हा कार्यक्रम खूप छान वाटला. हा रेकॉर्डेड कार्यक्रम मी बसमध्ये वॉकमनवर ऐकला होता. आणि इथूनच आवाजाशी नातं जडलं ते कायमचंच. या छोट्याशा रेकॉर्डिंगनंतर युववाणीतला प्रवास सुरू झाला. अनेक मुलाखती, चर्चा, गप्पांचे कार्यक्रम केले. यानिमित्ताने अनेक मोठ्या लोकांशी भेटी झाल्या. कालांतराने मला युववाणीसाठी पूर्णवेळ काम करणं शक्य नव्हतं. पण तरीही प्रतिमा मॅडमनी क्रमशः पुस्तक वाचनाची संधी दिली. राजेंद्रसिंह यांनी केलेल्या कामाचं जोहड या पुस्तकाचं क्रमशः वाचन मी केलं. खूप दिवस हा कार्यक्रम सुरू होता. त्यावरही अनेकांच्या उत्तमोत्तम प्रतिक्रिया आल्या.

चार वर्षांनी ग्रॅज्युएशन झाल्यावर वृत्तविभागात काम करायचं ठरवंलं. त्यामुळे तिथली एन्ट्रन्स, व्हॉइस टेस्ट दिली आणि काम सुरू झालं. काम करण्याची वेळ देखील निराळीच होती. पहाटे चार वाजता. सकाळी ता वाजून पाच मिनिटांचं बातमीपत्र.. म्हणजे चार वाजता काम सुरू. घरातून बाहेर पडल्यावर आजूबाजूचं निवांत झोपलेलं जग पहायचं आणि आपल्याकामासाठी बाहेर पडायचं. असं सुरवातीचे काही दिवस झालं. पण काही दिवसांनी या कामाच्या वेळेची सवय झाली आणि याच वेळेतलं काम आवडू लागलं. म्हणता म्हणता.. या कामाशी आठ ते दहा वर्षं कशी जोडली गेली ते समजलं नाही. लोकांपर्यंत दहा मिनिटे लाइव्ह आवाज नेण्याचा हा अनुभव अतिशय वेगळा होता. रेडिओवर ऐकणाऱ्यांना हे सगळं फार सोपं वाटत असतं. पण प्रत्यक्षात काम करणाऱ्यांना इथल्या कसरतीचा अनुभव असतो. कित्येकदा घड्याळातली सेकंदाची वेळ कशी निघून जाते हे आपल्याला समजतही नाही. पण आकाशवाणीत काम करताना सेकंदाचं महत्त्व समजलं. ठरलेल्या वेळेपेक्षा काही सेकंद बातम्या संपण्याची वेळ लांबली तर किती अडचणी निर्माण होऊ शकतात, हे जवळून पाहिलंय. आकाशवाणीच्या न्यूज रूममधलं ऑन एअर काम करणं, म्हणजे खरोखरंच खूप चॅलेंजिंग. टाइम मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, न अडखळता, आवाजात कोणताही खर न आणता सलग दहा मिनिटे बातम्या वाचणं... वाचणं पेक्षा सांगण.. हा शब्द जास्त योग्य आहे. तसंच बातमी कोणतीही असली तरी आपण त्या विषयाच्या भावनेत न गुंतता तटस्थ राहून ऑन एअर काम करणं.. अशा अनेक गोष्टी या निमित्ताने शिकायला मिळाल्या. काही तांत्रिक गोष्टींची भर पडली आणि इथे काम करणं अधिकाधिक आवडू लागलं. काचेच्या बंदिस्त स्टुडिओमध्ये घडणारे अनेक किस्से कामातला अनुभव समृद्ध करणारे ठरले. स्टुडिओमध्ये काम करताना बाहेरच्या जगाशी संपर्क न राहता देखील जगात काय चाललंय, हेच स्टुडिओ बाहेरच्या लोकांना बातम्यांच्या माध्यमातून सांगण्याचा अनुभव वेगळा होता. काही दिवसांच्या खंडानंतर हे दिवस पुन्हा अनुभवता येतील, असा प्रयत्न आहे.

सीमा सलीम देसाई