Sunday, 4 August 2013

ध्यास मोकळ्या श्वासाचा..



विशेष मुलांचे विशेषत्व मुद्दाम अधोरेखित न करता त्यांना सामान्यांमध्ये सामावून घेतले तर त्यांच्या पालकांची उमेद काकणभर वाढेल. सार्वजनिक ठिकाणी अजूनही या मुलांना आपलेसे केले जात नाही.
तुमच्या `ह्या` मुलांना बागेत मोकळं सोडू का, आमची मुलंही तिथेच खेळतायत… अहो बाई, तुमच्या मुलाला दुसऱ्या सीटवर बसवा प्लीज.. इथे नको.. सार्वजनिक ठिकाणी `त्या` मुलांना सामान्यांपासून नेहमीच असे वेगळे केले जाते आणि त्यांच्यातले विशेषपण जाणूनबुजूण अधोरेखित केले जाते. इथेच त्यांचे पालक खचतात, निराश होतात आणि आपल्या मुलाचं पुढे काय होणार या विचाराने आणखी चिंताग्रस्त होतात. मतिमंद, मेंदूता पक्षाघात असणे, आत्ममग्न किंवा बहुविकलांग असलेल्या मुलांचा विशेष मुलांमध्ये समावेश होतो. यांच्या पालकांपुढे समस्या अनेक आहेत आणि काही वेळा समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्यांच्या समस्येत भरच पडते.

पालकांसमोरील समस्या
मुळातच, आपल्या घरात जन्माला आलेले मूल हे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम नाही, हे मान्य करायलाच पालकांना वेळ लागतो आणि हे मान्य करून पुढे जाणे, ही त्यांची आयुष्यातली निम्मी लढाई जिंकल्यासारखे असते. लहान-मोठ्या उपचारांनी मूल बरे होईल, अशा अपेक्षेने पालक अनेक डॉक्टरांकडे दाखवितात. पण त्याची कमतरता लवकर मान्य करीत नाहीत. सुरवातीला पालक या मुलांना सामान्य शाळेत प्रवेश घेतात. तेथे अन्य मुलांच्या तुलनेत हे मूल प्रगती करत नाही, आकलन करू शकत नाही, व्यक्त होत नाही. त्यामुळे त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास झालेला नाही, हे लक्षात येताच पालक निराश होतात. समाजात या मुलांना फार मिसळू देत नाहीत. वेळेवर न मिळालेले उपचार किंवा अनेकविध उपचारांमध्ये खर्च झालेला पैसा त्यातून अधिकच येणारे नैराश्य मानसिक खच्चीकरण करते. घरात दुसरे मूल जर नॉर्मल असेल तर हे विशेष मूल काहिसे दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. (ही शक्यता फारच कमी कुटुंबांमध्ये असते.)
विशेष मुलांना वैद्यकीय उपचारांबरोबरच मानसिक आधार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रेम, आपुलकी यांची खूप गरज असते. अशा मुलांसाठी असलेल्या शाळांची फी देखील थोडी जास्त असते. त्यामुळेही पालकांना समस्या निर्माण होते. शिवाय हे मूल म्हणजे पालकांची आयुष्यभराचीच जबाबदारी असते. आपल्यानंतर याचे काय होणार या प्रश्नाने ते ग्रासलेले असतात. अशा परिस्थितीत समाजाकडून आधाराची अपेक्षा करावी, तर तेथेही उपेक्षाच मिळते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर या गोष्टीचा परिणाम होतो.

थोडीसी हसी.. थोडीसी खुशी
बसप्रवासात विशेष मुलांना शेजारी बसू न देणे, बागेत सामान्य मुलांशी त्यांना खेळू न देणे.. थिएटर, मॉल, लग्न समारंभात या मुलांकडे सतत निरखून पाहणे, आणि त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशा गोष्टी समाजात अवती-भवती सतत घडत असतात. मुळात एखादे मूल विशेष असणे हा त्याला असलेला आजार नसून ती एक अवस्था असते, ही गोष्ट समाजात रुजली पाहिजे. कुटुंबात असलेल्या अशा एका मुलामुळे खचलेले पालक आणि समाजात मिसळताना त्यांना वाटणारी अपराधीपणाची भावना यामुळे ते मूल अधिकच दुर्लक्षित होत जाते. अशा कुटुंबाबत किंवा मुलांबद्दल समाजाने कीव करण्यापेक्षा यांना प्रेम देण्याची गरज आहे. या भावनेतून मदत केल्यास त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नाही. उलट अशा परिस्थितीत हे मूल अधिक आनंदी होऊन त्याची उमेद वाढेल. समाजाकडून काहिशी अवहेलना होत असताना अलिकडे तरुण मुलांचा या विशेष मुलांकरवी ओढा वाढत आहे. मोठ मोठ्या कंपन्या किंवा आय टी सेक्टरमधील युवक आवर्जून संस्थांकडे येऊन मदतीची विचारणा करतात. अशा विशेष मुलांसाठी आम्ही काय मदत करू शकतो, असे विचारतात आणि संस्थांना त्यांच्याकडून सकारात्मक रिझल्ट्स मिळत आहेत. 

सीमा शेख
(पूर्व प्रसिद्ध ः म. टा. ४ ऑगस्ट २०१३)

पुरुषसत्ताक म्हणजे पत्नीवर सत्ता नव्हे…


कौटुंबिक हिंसाचार हा विषय नवीन नाही. बायकोला मारणे हा प्रकार समाजातल्या निम्नस्तरात अगदी सर्रास होत असताना आता उच्चभ्रू कुटुंबांमध्येही सहजरित्या घडत आहेत. फरक एवढाच की निम्नस्तरातल्या महिला या गोष्टी उघडपणे बोलून दाखवतात आणि उच्चभ्रू कुटुंबातील महिला याची वाच्यता होऊ देत नाहीत. पण समाजात पुरुषसत्ताक पद्धती मान्य असण्याचा अर्थ पत्नीवर सत्ता गाजवणे असा होत नाही, याचा कुठेतरी विसर पडत आहे.


मोलकरीण अचानक दोन दिवस न सांगता सुटी घेते. सहाजिकच गृहिणी वैतागते. पण दोन दिवसांनी कळतं की मोलकरणीच्या नवऱ्यांनं तिला मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी घडलेलं सगळं विसरून ती तिच्या कामांना सुरवात करते. पुन्हा पुढच्या दहा-पंधरा दिवसांत पुन्हा एखादा दिवस तिच्या घरात असाच असतो. ती स्त्री जितकं सहन करते, तेवढंच तोडीचं नवऱ्याला उत्तरही देते आणि आपलं मन मोकळं करायला तिला कमीपणाही वाटत नाही. या उलट उच्चभ्रू कुटुंबांमधून दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार वाढत असताना बदनामी नको, शेजारी कळलं तर काय होईल, नातेवाईक नावे ठेवतील, आई-वडील पाठिशी उभे राहतील का, अशा अनेक कारणांमुळे या कुटुंबातील महिला व्यक्त होत नाहीत.

अशीच एक सत्य घटना.. एकाच घरातल्या दोन उच्चशिक्षित मुली. नोकरदार. स्वावलंबी. पण माहेरून पैसे आणण्यासाठी सासरी छळ होत असल्याने दोघी आई-वडिलांकडे आलेल्या. पालकही मुलींच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याऐवजी सासरी जाण्यासाठी आग्रही. अजूनही या मुली आपल्या निर्णयावर ठाम राहून नकार देऊ शकत नाहीत. मोकळेपणाने त्यांच्या अडचणींबद्दल पालकांशी बोलू शकत नाहीत किंवा पतीशी चर्चा करत नाहीत. दोन आठवड्यांपूर्वी अभिनेत्री युक्ता मुखी हिने देखील पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आणि पुन्हा एकदा उच्चभ्रू कुटुंबातील स्त्रियांचा छळ हा विषय चर्चेत आला.
आपल्या देशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियाच अधिक कार्यक्षम, निष्ठावान, बुद्धिमान असतात, असे  विविध सर्वेक्षणांमधून सिद्ध झाले आहे. मात्र वास्तवात, पत्नीच्या क्रियाशीलतेला, क्रयशक्तीला आपल्या पुरुषी अहंकारांनी दाबून, कुस्करून टाकण्याचा प्रयत्न होतोय. तिचे स्वातंत्र्य, अस्तित्त्व, छंद यांवर बंधने येत आहेत. आवडी-निवडींना मुरड घातली जात आहे. पत्नीने आर्थिकतेत मदत करणे हा काही पुरुषांना अपमान वाटतो, याचा खेद आहे.

कुटुंब कोणत्याही स्तरातील असले तरी कौटुंबिक हिंसाचाराची कारणे फारशी वेगळी नाहीत. पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय, तिने पतीशी वाद घालू नये, तसे केल्यास अपशब्दांचा वापर, मुलाचा आग्रह धरणे, मुलीच्या जन्मावरून पत्नीला दोष देणे, लहान-मोठ्या कारणांसाठी माहेरून पैसे मागणे, स्वयंपाकावरून तक्रारी, मूल होऊ न शकल्यास टोचून बोलणे, पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न या सगळ्या कारणांबरोबर आता अलिकडे सोशल नेटवर्किंगवरील फ्रेंड्स सर्कल, पत्नीचा जुन्या मित्रांशी होणारा संपर्क, तिचा मोबाईल वारंवार पाहणे, संशय व्यक्त करणे अशा अनेक गोष्टींवरून पत्नीचा छळ केला जातो. वास्तविक पाहता या गोष्टी क्षुल्लक वाटतील किंवा शांतपणे चर्चेतून यावर तोडगा निघेल असे वाटेलही. पण याच गोष्टींवरून सतत बोलून तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. विनाकारण सतत ती अपराधी असल्याची भावना तिच्या मनात निर्माण केली जाते.

पावसानं झोडपलं आणि नवर्‍यानं मारलं तर दाद कुणाकडे मागायची.. स्त्रीचं नशीबच ते.. असं म्हणत नात्यांमध्ये काही वेळा हा पुरुषी अहंकार डोकाविण्यासही स्त्रिया कारणीभूत असू शकतात. अन्याय सहन कर, तू उलट बोलू नकोस, एकदा लग्न झाल्यावर माहेरी परत येऊ नकोस, थोडा त्रास सहन कर..संसारात हे चालतंच.. असे उपदेश मुलीला तिच्या माहेरून होत असतात आणि केवळ सहनशीलता हाच तिचा धर्म असल्याची मानसिकता तयार करीत असतात. याच ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार सहन करण्याला खतपाणी मिळत राहते. 

महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, धोंडो केशव कर्वे अशा अनेक समाजसुधारक पुरुषांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. मात्र, सध्याचा पुरूष ही बाब लक्षातच घेत नाही. अन्य कारणांसोबत व्यसन हे खूप मोठे कारण कौटुंबिक हिंसाचारात लक्षात घेतले पाहिजे. कॅज्युअली किंवा ऑकेजनली घेतले जाणारे ड्रिंक कधी व्यसन बनते, हे समजत नाही आणि त्याचे कुटुंबावर विपरित परिणाम होतात, असे अॅड. ज्योती सोरखडे म्हणतात.


सीमा शेख
(पूर्व प्रसिद्ध - म.टा. जुलै २०१३)