गुपीत
अलिकडे कोणतीच गोष्ट गुपीत राहात नाही, असं वाटतंय. पूर्वी शाळेत मिळालेलं बक्षीस घरी येईपर्यंत स्वतःपुरतं गुपीतच असायचंकी.. घरी आल्यावर दप्तरातून काढून हळूच दाखवायचं मग आई खूष होणार.. त्यानंतर संध्याकाळी बाबा घरी येईपर्यंत हे गुपीत घरात गपचूप बसलेलं असायचं. मग बाबा आले.. हात पाय धुतले की त्यांचा चहाचा कप हातात येई पर्यंत आपणही हळूच पाठीमागे लपवून ते बक्षीस आणायचं आणि एकदाचं गुपीत उघड करायचं.. आता तुमच्या पोराला उद्या शाळेत बक्षीस मिळणार आहे.. असा मेसेज सुद्धा आदल्या दिवशी शाळेकडून येतो.. फुटलं गुपीत..
पूर्वी सरप्राइज म्हणून पाहुणे मंडळी अचानक घरी येऊन धडकायची.. आता घरी यायच्या आधी मेसेज करून परवानगी मागतात.. यात सरप्राइज उरलं नाही..
दिवसभरातल्या बातम्या बघण्यासाठी संध्याकाळच्या सात वाजण्याची वाट पहावी लागायची. आणि मग त्यातला शब्द अन् शब्द मोठ्या माणसांना ऐकायचा असायचा, मग आमच्यासारख्यांना चिडीचूप बसावं लागायचं. आता बातम्यांचंही गुपीत काही संध्याकाळपर्यंत टिकत नाही. हातातल्या मोबाईलवर ते सगळ्यात आधी टकटक करतं.. वाटलं तर वाचा नाहीतर सोडून द्या..
अशा सगळ्या गोष्टी आता अतिशय वेगाने पसरतात. क्षणार्धात..सरप्राइज, गुपीत, गंमत.. या सगळ्या शब्दांमधली देखील मजा हळूहळू संपत आल्यासारखी वाटतेय.. म्हणूनच अशीच एक गंमत म्हणून आम्ही घरात गेले अनेक दिवस अशी गुपीतं तयार करतोय. अगदी लहान लहान गोष्टीतून कसा आनंद मिळतो, हे मला यातून बघायला मिळालं.. खूप मजा आली.
श्रावण, गणपती, नवरात्र सुरू झाल्यापासून काही ना काही गोडधोड पदार्थ सुरू होतेच. म्हटलं यातूनच गंमत करू. सखीला बोलावून सांगितलं, ``आज आपण मोदक करतोय. आपल्या दोघींचं सिक्रेट आहे. बाबांना सांगू नकोस.`` असं कानात सांगितल्याबरोबर चिमुकला हात तोंडावर ठेऊन गोड खुदूखुदू हसली आणि बाहेर पळाली.. आता ती पुढे काय करणार हे मला माहीत होतं. लगेच स्वयंपाकघरात येऊन मला म्हणाली, ``मी जरा बाबांशी बोलतेय.. पण आपलं सिक्रेट नाही सांगत.. असंच काहीतरी बोलायचंय मला..``
मी म्हटलं, ``बोल ना मग..``
मला म्हणाली, `तू आत्ता काय नाव सांगितलंस, ते तू आज करणारेस.. मोगद का काय तेच ना..?``
मी म्हटलं, ``हो.``
हॉलमधून खुसफूस कानगोष्टी केल्याचा आवाज आलाच आणि त्यात जोडीला तिचं खुदूखुदू हसणं. आणि इतक्यात तिचे बाबा मोठ्याने म्हणालेच, ``अरे व्वा.. मोदक मिळणार आहेत !!``
काहीच ऐकू न आल्यासारखं मी आतून म्हटलं, ``काय झालं..?``
दोघं लगेच सावरून घेत म्हणाले, ``काही नाही गं.. टिव्हीवर ते रेसिपी शो मध्ये मोदकांचा फोटो दाखवला ते बघून आम्ही बोलत होतो..``
मी हसले आणि आत गेले. (पुन्हा एकदा कानावर खळाळतं हास्य पडलं)
आईचं आणि तिचं गुपीत परस्पर बाबांना सांगितल्याचा खूप आनंद होता तिच्या चेहऱ्यावर. गुपीत हे मनातल्या कुपीतच ठेवायचं असतं हे तिला माहीतच नाहिये अजून. तिला ते कधी एकदा बाबांना सांगतेय असं होत असतं. ते घरात नसतील आणि एखादी गोष्ट सिक्रेट आहे, ``सांगू नको`` म्हटलं की ही संध्याकाळपर्यंत घोकत राहते तो शब्द. आणि मग ते घरी आले की मला म्हणते, ``तूू जरा चहा कर बाबांना. मी थोडं बोलून येते त्यांच्याशी.``
(मला कळतं काय शिजतंय ते)
पण फार मज्जा आहे यात.. सध्याच्या काळात आमचं आम्ही सुरू केलेलं हे एक मनोरंजन.
यात विलक्षण खळाळतं हास्य, लुकलुकते डोळे, चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि कधीतरी गुपीत फुटल्याचा आनंद आम्हाला बघायला मिळतो.
आता या सिक्रेट, सरप्राइज, गुपीत यातली गंमत वाटायला लागल्यापासून ``आज आपण आलू पराठे सिक्रेट करूया का आपलं?``, असंही तिने मला विचारलंय. मग तिच्या समाधानासाठी ते आमच्या दोघींचंच त्या दिवसाचं गुपीत असतं.
#गुपीत #सिक्रेट #सरप्राइज #सखीसंवाद
©️ सीमा देसाई