कोरी पाटी..
....
माझं पुस्तक घेऊन झालं.. पैसे देणार इतक्यात पावती करण्यासाठी त्यांनी मला नाव आणि पत्ता विचारला. अर्थात ते एका देवस्थानचं आॅफिस असल्यामुळे त्यांना रितसर पावती करणं आवश्यक होतं.. मी नाव सांगितल्यावर पावती करणाऱ्या महिलेने झटकन मान वर करून माझ्याकडे पाहिलं. आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. हे पुस्तक तुमच्यासाठीच हवंय.. मला विचारलं. मी हो म्हणून सांगितलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य संपलेलं नव्हतं. अखेर न रहावून त्यांनी मला विचारलंच.. तुम्हाला आमच्या देवस्थानच्या माहितीचे पुस्तक कशासाठी हवं आहे.. खरोखर आश्चर्य आहे.. या माहिती पुस्तकाचे तुम्ही काय करणार.. मी म्हटलं, मला थोडं लिहायचं आहे, या विषयावर म्हणून संदर्भासाठी हवंय..... एवढा संवाद संपला आणि माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं...
मला एक गोष्ट समजत नाही.. नावानं हिंदू नसलेल्या एखाद्याला अन्य धर्माची पुस्तकं वाचणं, अभ्यास करणं यावर काय बंधनं असतात.. समाज आपला समाज अजूनही या जाती-धर्मांच्या चौकटीतून बाहेर येत नाही. अर्थात माझ्या या अभ्यासाविषयी त्या संबंधित देवस्थानच्या कार्यालयात खूप कौतुक केलं गेलं, हे सांगायला नको. पण हा समाज अशा चालिरितींमध्ये बांधला गेला आहे, की आपण त्या पलिकडे विचारच करू शकत नाही.
कधी कधी वाटतं, या जाती आणि धर्माच्या रेषा आपणच आखत असतो, पण ते पुसण्यासाठी मात्र पुढे येणारे खूप कमी असतात. शालेय वयातील मुले फार निरागस असतात. त्यांच्या मनाला असे विचार कधी शिवतही नाहीत. कारण, त्यांच्या मनाची पाटी कोरी असते आणि जसजशी हीच मुलं मोठी होत जातात तसतशी ही कोरी पाटी विविध शिकवणुकींनी भरली जाते. आणि त्यात सर्वांत मोठा वाटा असतो तो सामाजिक शिक्षणाचा.
माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेला असाच एक अनुभव..
तिचा जावेद नावाचा मित्र ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी आलेला. त्याचं गाव शहरापासून जवळच असल्याने बैलपोळ्याच्या दिवशी तो घरीच थांबला. त्याच्या काॅलेजमध्ये मित्रांना ही गोष्ट समजली. त्यांनी आश्चर्याने विचारलं.. अरे, तू मुस्लिम आहेस ना.. मग बैलपोळा कसा साजरा करता.. हा तर हिंदूंचा सण आहे ना.. जावेद म्हणाला, अरे हिंदू काय आणि मुस्लिम काय.. बैलपोळा का साजरा करतात.. वर्षभर बैल आपल्या शेतात राबतात, कष्ट करतात.. म्हणूनच आपल्याला अन्नधान्य मिळू शकतं. आपण जेवताना हे लक्षात घेतो का, की हे धान्य हिंदू, मुस्लिम यापैकी कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून पिकलं आहे.. नाही ना.. मग या सणाच्या दिवशी आम्ही देखील शेतात राबणाऱ्या बैलाला एक दिवस आराम देतो. त्याची पूजा करतो, गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतो. त्याला सजवतो. गोडा-धोडाचं जेवण करतो... झाला सण साजरा.. यात कसला धर्म आणि कसली जात..
सीमा शेख
…..