Wednesday, 24 April 2013

अजूनही आशा आहे...

एखादं आयुष्य उद्ध्वस्त होणं, म्हणजे काय असतं ते मी खूप जवळून पाहिलंय. जे पाहिलंय त्यापेक्षा वाईट एखाद्याच्या आयुष्यात काहीच असू शकत नाही असं वाटतं. आणि तिचं आयुष्य अजूनही तसंच चाललंय. आला दिवस ढकलायचा, दुसरं काही नाही. कारण, आता सगळी दारं बंद झाली आहेत. स्वतःहून टाकलेलं पाऊल मागे घेता येत नाही आणि मागे घेतलंच तर ते टेकविण्यासाठी टिचभर हक्काची जागादेखील उरलेली नाही. आई, वडील, भाऊ सगळ्यांनीच पाठ फिरवलेली. त्यामुळे पदरी आलेल्या आयुष्याला सामोरं जाणं, या पलिकडे ती आता काहीच करू शकत नाही. गेली २० वर्षं फक्त घरातच राहिलेली. क्वचित कधीतरी बाहेर जायचं. सणवार नाहीत की लग्नसमारंभही नाहीत...

आता जवळपास चाळीशीची ती. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी. आमची पहिली भेट कशी झाली ते देखील आठवत नाही. आम्ही कधी फार भेटलोही नाही. पण आमची मैत्री फोनवरची जास्त. एकदा केलेला फोन किमान वीस मिनिटे चालणार आणि मग गेल्या कित्येक दिवसातल्या गोष्टींचं शेअरिंग यानिमित्ताने होतं. ती मूळची खेड्यातली. कदाचित दोन्ही भावांची शहरातली नोकरी, तिचंही लग्नं शहरात झालेलं म्हणून ती पुण्याकडे आली असावी. गावतल्याच मुलाशी घरच्यांनी बघून करून दिलेलं लग्न. चूक एकच की त्या मुलाची आणि कुटुंबियांची पुरेशी माहितीच काढली नाही आणि वडीलधाऱ्यांनी हिचं लग्नं घाईघाईने उरकूनच टाकलं म्हणायचं. अर्थात, शिक्षणंही तिथंच थांबलं. पण किमान तिच्या हातात पदवी होती.

लग्न झाल्यावर ती पुण्यात आली. पहिले काही दिवस चांगले गेले असावेत. पण थोड्याच दिवसात नवरा विचित्र वागायला लागला. घरी वेळेवर यायचं नाही, तिच्या हातचं जेवायचं नाही, तिच्याशी शब्दानेही संवाद ठेवायचा नाही.  आणि एक दिवस अचानक तो घरातून जो गेला तो अजूनपर्यंत परत आलेला नाही. या गोष्टीला आता माझ्या अंदाजाने १२ ते १५ वर्षं झाली असतील. आज येईल, उद्या येईल म्हणून ती वाट पहात राहिली. संवादासाठी बोलणं नव्हतं त्यामुळे भांडण करून निघून गेलाय असंही नव्हतं.

काही दिवसांनी तिनं घरातली कपाटं सहज पाहिली तर त्याच्या माहितीच्या पुराव्याचा एकही कागद त्याने घरात ठेवला नव्हता. रेशनकार्डासहित ओळखीसाठी लागणाऱ्या सगळ्या पुराव्यांनिशी त्याने घर सोडलं होतं. तिला तसंच वाऱ्यावर टाकून. तिला आधार द्यायचा सोडून तिच्या माहेरच्यांनी तिलाच दोषी ठरवायला सुरवात केली. बहुदा त्यांनंतरचे काही दिवस भावाकडे राहिली. पण त्याचाही संसार सुरू झालेला. त्याच्यात अडचण नको म्हणून भावाने दोन खोल्यांचा त्याचा फ्लॅट तिला देऊ केला. त्यातंच तिचं विश्व तयार झालं. दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस काय असतात, हे तिला आता समजायला लागलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. गावी जाऊन त्याचा शोध घेतला. माहिती काढल्यावर समजलं की त्याच्या घरात आई मानसिक विकृत होती. बहुदा हा देखील तसाच. आणि याच्याशी लग्न केल्याबद्दल गावतल्यांनी हिलाच वेड्यात काढलं. पोलिसांत तक्रार दिली पण उपयोग झाला नाही. त्याचा शोध लागला नाही. मित्र, नातेवाईक सगळीकडे चौकशी केली. अखेर किती वर्षं एकटं रहायचं म्हणून पुनर्विवाहाचा विचार तिच्या मनात आला. त्यासाठी घटस्फोट होणं आवश्यक होतं. पण तिनं घटस्फोटाचा विषय काढला म्हणून माहेरच्यांनी तिची साथ सोडली. `तुला काय करायचं ते तुझं तू बघ..` असं म्हणून जणू तिला वाऱ्यावरच सोडलं.

शेवटी तिनंच धाडस केलं आणि फॅमिली कोर्ट गाठलं. घटस्फोटाची प्रक्रिया विचारली. तेव्हा पुन्हा एकदा त्याचा शोध घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. त्याची माहिती सरकारी कार्यालयांमध्ये पाठविण्यात आली. तेव्हा समजलं की त्याच्या नावे पासपोर्ट काढला गेला आणि अबूधाबीच्या व्हिसावर तो देश सोडून निघून गेला होता. घटस्फोटासाठी त्याला नोटिसा पाठवायला सुरवात झाली. समन्स बजावला. तो उत्तर देईना. मग कायद्यातील तरतूदीनुसार, तीन वेळा नोटीस पाठवूनही हजर न झाल्याने हिच्याबाजूने एकतर्फी घटस्फोट देण्यात आला आणि हिचा मार्ग मोकळा झाला. आता पुन्हा एकटी बाई म्हणून समाजात राहण्याचं दडपण. इतके दिवस गळ्यातल्या मंगळसूत्राचा तरी आधार होता. आता तेही नाही. स्थळं बघण्यासाठी नाव नोंदवलं तरी तिथे गैरफायदा घेणारेच अनेक. अखेर ओळखीतूनच एकजण भेटला. पहिल्या भेटीत तिला चांगला वाटला. लेकीचं आयुष्य आता सावरतंय असं म्हणून तरी आई-बापानं तिच्या आनंदात सामील व्हावं, तर तसंही नाही. `कर तू.. तुला काय करायचं ते..` असं म्हणून त्यांनी पुन्हा हात झटकले. अखेर तिनं तिच्या हिमतीवर निर्णय घेतला. दोघांनी आळंदीत लग्नं केलं.

मला वाटलं, आता हिचं आयुष्य सुरळीत होईल. गेली १२ वर्षं दोन खोल्यांच्या घरात टीव्हीशिवाय केवळ घरातलं काम आणि लायब्ररीच्या पुस्तकांच्या आधारे निम्म आयुष्य घालविल्यावर तिच्या वाट्याला सुखाचे चार दिवस तरी येतील. पण एखाद्याच्या आयुष्यात सुख हेलकावणी देतं, ते असं... हिच्या आयुष्यासारखं. दुसरं लग्नं झाल्यासरशी भावानं तिचं राहतं घर कोणालातरी भाड्याने देऊन टाकलं. ती नवीन घरात लक्ष्मी बनून गेली. पण तो देखील असाच विचित्र, विक्षिप्त निघालाय. कामानिमित्त २-२ दिवस घरी येत नाही. आला तरी चार दिवस बरा वागतो, पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी. आयुष्यं कुठंतरी स्थिरावतंय असं म्हणताच त्याची घडी विस्कटायला लागते. मोठा फ्लॅट असून उपयोग काय. ही पुन्हा एकटीच. आता सोबतीला टीव्ही तरी आहे. अशा एकट्या राहण्यानं तिला आजारपण येतंय. पूर्वीपासूनच संधीवाताचा त्रास आणि बरेच काही लहान-मोठे विकार जडले आहेत. मात्र, सुखाच्या आशेने जे पाऊल उचललं ते देखील फसलेलं पाहताना बऱ्या होणाऱ्या व्याधी अजूनच ग्रासतायत आणि या सगळ्यात तिचं मन जास्तच आजारी होतंय. आता मात्र, ती उद्ध्वस्त झालीये. आयुष्यातलं एकटेपण आणि एकट्यानं आयुष्यं जगणं या दोन्ही गोष्टी तिचा पाठलाग सोडत नाहीयेत. सुरळीत चाललेल्या जीवनाच्या गाडीने नितांत सुंदर प्रवास करावा, लखलखीत स्वप्नांची उधळण करावी.. यापासून ती कोसो दूर आहे.. पण अजूनही आशा आहे.. कधीतरी हे बदलावं...आणि त्याच आशेवर ती जगत आहे..

बुधवार, २४ एप्रिल २०१३
सीमा शेख

Tuesday, 16 April 2013

सानुली ती...

रोज संध्याकाळी साडेचार वाजताची वेळ. ऑफिसमधून चहासाठी खाली उतरल्यावर ती मला दिसतेच. एखाद्या दिवशी नाही दिसली तर माझी नजर तिला शोधत असते. का कोण जाणे तिच्या निरागस चेहऱ्यावरचं हास्य मला खूप समाधान देऊन जातं. ती सुंदर आजिबात नाही. पण तिचे डोळे खूपच बोलके आहेत. तिच्याकडे पाहिलं की असं वाटतं, तिला मला काहीतरी सांगायाचंय. माझ्याशी खूप काही बोलायचं. पण ती फक्त गोड हसते आणि तिचा छोटूसा हास हलवून मला टाटा करते.

सावळ्या रंगाची ती... गोबरे गाल.. खूप छोटेसे किलकिले डोळे... फक्त अडीच फूट उंची आणि वयसुद्धा त्याच्याच आसपासचं तीन- चार वर्षांचं असेल. मला रोज न चुकता दिसते. आधी फक्त लांबूनच माझ्याकडे बघायची. मग एक आठवडाभर असंच चाललं. हळूहळू तिला समजायला लागंल की, मी रोज इथे चहा प्यायला येते. मग ती माझ्या भोवताली घुटमळू लागली. तिचे वडील आसपासच्याच दुकानात काहीतरी काम करतात. घरंही तिथेच कुठेतरी असावं. त्यामुळे ती दिवसभर त्याच कॉम्प्लेक्समध्ये खेळत असते. कधी चार वर्षांच्या चिमुरडी सारखी हातात बाहुली घेऊन, तर कधी वडिलांच्या बरोबरीने त्यांच्या कामातही मदत करते. शेवटी एका बापाची लेकच ती. तो काम करतोय म्हणून तिला स्वस्थ नाही बसवणार. ती सुद्धा तिचा छोटुकला कुंचा हातात घेते आणि कॉम्प्लेक्समधल्या चार फरशा स्वच्छ करते. तिला त्यातही खूप आनंद वाटतो. थोडी मजाही येते. आणि कुंचा फिरवल्याचं समाधानही तिच्या चेहऱ्यावर दिसतं. तिच्या लहानशी हातात न पेलवणारा तांब्या घेऊन कधीतरी सडा मारते आणि तापलेल्या जमिनीतून येणाऱ्या मातीच्या वासाचा दीर्घकाळ आनंद घेते. हे सगळं तिचा चेहरा बोलत असतो. तिच्या तोंडून अजूनही पुरेसे आणि स्पष्ट शब्द फुटत नाहीत. त्यामुळे ती कोणत्या भाषेत बोलते हे देखील मला समजलं नाही. पण तिला हिंदी समजतं, हे नक्की.

रोज तिच्याबद्दल विचार होतच होता.. आज न रहावून चार वाक्यं लिहाविशी वाटली.. तिथे चहासाठी येणाऱ्या सगळ्यांनाच ती ओळखीची झाली आहे. अजूनही मला तिचं नाव माहीत नाही. पण तिचं लोभसवाणं निरागसपण माझ्या कामाची शीण घालवतं हे नक्की.आमच्या चहाच्या दुकानाजवळ पायात पैंजण घालून दु़डूदुडू खेळणारी तिची पावलं उरलेला अर्धा दिवस मनात रुंजी घालतात. आता फक्त काळजी एकच वाटते, की सध्या गंमत म्हणून वडिलांच्या कामात मदत करणारे तिचे हात याच ठिकाणी रमू नयेत. त्या हातांमध्ये रंगीत पेन्सिली, पेन, खडू, कोऱ्या वह्या आणि गोष्टीची रंगीत पुस्तकं सुद्धा खेळती व्हावीत. तिच्या निखळ हास्यात लपलेलं बालपणही असंच कायम रहावं आणि व्हरांड्यात घालवलेलं बालपण जेव्हा मोठं होईल, तेव्हा बापानं खर्ची घातलेल्या घामाची तिला कदर रहावी..

सीमा शेख
मंगळवार, १६ एप्रिल २०१३

अखेर सिद्ध केलं…


१६ मार्च २०१३ ला एक वर्ष झालंय. गेली अनेक वर्षे आपापल्या वर्तमानपत्रात काम करत होतोच पण असाइनमेंट्सच्या शिवाय एकमेकींना भेटणं शक्य होत नव्हतं. पण आता पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माध्यमातून ते अगदी सहज शक्य झालं.
कोणत्याही चार महिला एकत्र येऊन फार दिवस एकत्र राहू शकत नाहीत, असे म्हणतात. पण आम्ही १५ जणींनी ते खूप सहज शक्य करून दाखवलं आणि या पुढच्या काळातही ते तसंच कायम राहील याची खात्री आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये विविझ वर्तमानपत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्र यावं आणि काही उपक्रम राबवावेत, असा विचार खूप दिवसांपासून सुरू होता. मात्र, याला मूर्त रूप देण्यासाठी पुढाकार घेतला तो आमची मैत्रीण निशा पाटील हिने. याची सुरूवात झाली ती मागील वर्षीच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने.
या दिवशी निशाचा अचानक सगळ्यांना फोन आला. या वर्षीचा फ्रेंडशिप डे माझ्याकडे साजरा करू या. आम्हालाही एकत्र येण्यासाठी निमित्त हवंच होतं. संध्याकाळी आम्ही सगळ्या मैत्रीणी तिच्याकडे जमलो आणि फ्रेंडशिप डे मजेत साजरा झाला. त्यानंतर हळूहळू काही ना काही निमित्ताने आम्ही भेटत राहिलोच. अशा भेटींमधूनच महिलांचा पत्रकार संघ सुरू करावा, अशी कल्पना पुढे आली आणि त्याला सगळ्याच मैत्रिणींनी पाठिंबा दर्शविला. निशा, मी, सायली कुलकर्णी, अर्चना दहिवाल, संगीता तरडे, स्मिता जोशी, मनिषा जोशी, रजनी पाटील, दिपाली बोरवे, अम्रपाली गायकवाड, लीना माने, संगीता कांबळे, स्वाती देशपांडे, आशा साळवी, संध्या टोमके, मनिषा थोरात, विजेता गवस, प्रणिता भालेराव, रेश्मा कुसाळकर, चैत्राली राजापूरकर आणि अमृता ओंबाळे... अशी एकेक नावे जमायला लागली. मग सुरवात झाली हे सगळं कसं आणि नेमकं काय करायचं. संघ सुरू करायचा म्हणजे ही प्रक्रिया कायम सुरू राहिली पाहिजे, हे महत्त्वाचं होतं. संघ सुरू केला आणि आणि कालांतराने उत्साह बारगळला असे करून चालणार नव्हते. त्यामुळे खूप विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आणि मुख्य म्हणजे निशा या निश्चयावर ठाम होती.
महिलांचा पत्रकार संघ सुरू करायचा यामध्ये आम्ही सगळ्यांत वेगळा विचार असा केला की, पत्रकार म्हणून काम करणाऱ्या महिलांखेरीज ज्या महिला वृत्तपत्रांमध्ये काम करीत आहेत, त्यांचाही यामध्ये समावेश असेल. प्रथमतः आम्ही सगळ्या महिला सोडून अन्य व्यक्तींनाच ही गोष्ट रुचली नव्हती. मात्र, ज्यांच्यासाठी हा संघ नव्हताच, त्यांची मते विचारात घेण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही आमच्या मतावर ठाम होतो. आम्हाला मैत्रिणी करायच्या होत्या. संघटना करायची होती. एक अखंड राहणारी साखळी गुंफायची होती. त्यामुळे मधुरांगण, सखी मंच यामध्ये काम करणाऱ्या तसेच पेजिनेशन, जाहिरात विभाग यासाठी काम करणाऱ्या महिलांनाही सामावून घेण्याचे निश्चित झाले.
शहरात महिला पत्रकार संघाची स्थापना होणार याची बातमी पसरली आणि असंख्य वेगवेगळ्या प्रतिक्रिया कानावर आल्या. महिलांच्या वेगळ्या संघाची गरजच काय, इथपासून बघू किती दिवस चालतोय संघ… अशी अनेक वाक्ये ऐकायला मिळाली. या उलट आमच्याच क्षेत्रातील अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊ केले. याचं कौतुक वाटलं. त्यामुळे अर्थातच आमचा आत्मविश्वास वाढला. मला असं वाटतं की, एखादं चांगलं काम करायचं असेल तर सकारात्मक पेक्षा नकारात्मक गोष्टींचा विचार आगोदर व्हावा. आम्हीही तेच केलं. आणि अंतिमतः आम्हाला हे काम करायचंच आहे, हे ठरवून उचललेलं पाऊल पुढे टाकलं.
अजूनही आठवतंय.. आम्हाला मिटिंग घेण्यासाठी जागा नव्हती. म्हणून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील उद्यानात आम्ही भेटत होतो. त्यानंतर एकदा संघाबाबत चर्चा करण्यासाठी १६ मार्चला भेटायचे आहे, असा निरोप मिळाला आणि कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सहकार्याने त्यांच्या कार्यालयाच्या गच्चीवर आमच्या मैत्रिणींची मिटिंग सुरू झाली. निशाला मदत म्हणून मिटिंगची मिनिट्स, उपस्थितीची नोंद या सगळ्या कामांना मी सुरवात केली होती. आणि हे सगळे सुरू असताना सर्वांत मोठे आश्चर्य म्हणा, विश्वास म्हणा किंवा काहीही.. अध्यक्ष म्हणून तू काम पहायचं.. असं निशाने माझ्याकडे बघून सांगितलं. आणि या वाक्याला रितसर मिटिंगच्या भाषेत म्हणतात तसं प्रस्ताव, अनुमोदन एकेकीने देऊन सगळ्यांनी माझा बकरा केला, हे समजलं होतं. खरंतर सामान्यपणे हा आनंद होण्याचा क्षण असतो. मात्र, माझ्यासाठी तो कधीच नव्हता. खूप टेन्शन, अनपेक्षित घटना आणि मैत्रिणींकडूनच झालेले टार्गेट या सगळ्याची क्षणात जाणीव झाली. अर्थात या ठिकाणी टार्गेट हा शब्द खूप चांगल्या अर्थाने आहे. त्यांच्या माझ्यावरचा विश्वास दिसून आला. आणि या सगळ्याचे नियोजन पूर्वीच झाले असल्याची कल्पनाही लगेचच आली म्हणता म्हणता वर्षं कसं संपलं समजलंच नाही. संघाच्या सदस्यांची आरोग्य तपासणी, शुद्धलेखन, कार्यशाळा, दोन आनंददायी सहली, इंग्रजी संभाषण वर्ग, आरोग्य विषयक व्याख्यान, कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी चार दिवसांचे निर्भय बना.. अभियान या सगळ्या गोष्टी सहज आणि सुविहीत होत गेल्या ते प्रत्येकीच्या सहकार्यामुळेच. त्याशिवाय हा पल्ला गाठणे शक्य नव्हते. बघू किती दिवस एकत्र आहेत, असा विचार करणाऱ्यांसाठी आमच्या संघाची वर्षपूर्ती हे निश्चित चोख उत्तर असेल. हा अंक प्रसिद्ध होईपर्यंत आमच्या संघाची दुसरी कार्यकारिणी कदाचित जाहीर झालेली असेल आणि दुसऱ्या वर्षाची घोडदौडही सुरू झाली असेल, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी…

सीमा शेख
(महिला दिनानिमित्त एका अंकासाठी लिहिलेला लेख)