माझी इवलीशी माय
चार दिवसांपूर्वीची गोष्ट.. सखीला केसाला तेल लावायला ये म्हणून सांगितलं. समोर बसवून तिच्या छोट्याशा केसांमधून हळूहळू बोटं फिरवत मी केस लावलं आणि दोन छोट्या पोनी घातल्या. माझं काम संपलं होतं. एखादी पटकन उठून गेली असती. मला म्हणाली, चल आता मी तुला तेल लावते. ती तेल लावणार म्हणजे.. चिमुकल्या बोटातून तेलाचे थेंब फरशीवर गळत माझ्या कपड्यांवर सांडत येणार या विचारानेच मी म्हटलं., नकोय मला. माझं मी लावेन नंतर. तर म्हणते, अगं तू मला तेल लावलंस ना, आता मी तुझी आई आहे. माझं ऐकायचं. मी पण तुझ्यासारखंच लावणार.
आणि अखेर तेलाच्या वाटीत तिने बोटं बुडवलीच. तसंच निथळतं बोट घेऊन माझ्या केसांच्या भांगांमध्ये फिरवायला सुरवात केली. आणि खरं सांगायचं तर अतिशय छान वाटलं. त्या चिमुकल्या बोटांमध्ये जोर नव्हता पण प्रेम खूप होतं. अगदी अलगद मायेने तिची बोटं माझ्या केसातून फिरत होती... माझ्या आईची आठवण करून देत. तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं, वय लहान असलं तरी स्त्री म्हणून अंतरातून येणारी माया, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी प्रत्येकीकडे आपसूकच असतात वाटतं. वयोपरत्वे त्याचं व्यक्त होणं बदलत असेल, समजूतदारपणा वाढत असेल. पण ठराविक वयात प्रेम निर्माण होतं किंवा वयाच्या एका टप्प्यावर आपुलकी वाटते असं नाहीये. ही लडिवाळ भावना मुलींमध्ये अगदी या चार वर्षाच्या वयात मी पाहिली. आणि आजच्या मदर्स डे निमित्त मला ही चार दिवसांपूर्वीची घटना पुन्हा एकदा आठवली.
सीमा सलीम देसाई
12 मे 2019