Tuesday, 20 February 2024

शाळेचं प्रोजेक्ट विकत घेतात?

 





काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली. एका आईनं आठ वर्षाच्या मुलासाठी लागणारं एक प्रोजेक्ट रेडिमेड मिळेल का, याची विचारणा केली होती. खरंतर प्रोजेक्टचा विषय फार अवघड नव्हता. पण ते शाळेच्या प्रदर्शनात ठेवायचं असल्यामुळे तो बाहेरून कोणी करून देईल का, आणि त्याची किंमत सांगा, असं विचारलं. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर घर भाड्याने मिळेल, सकाळच्या स्वयंपाकासाठी मावशी मिळतील का किंवा लग्नासाठी रुखवत करून हवं आहे, वास्तुशांतीसाठी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वस्तू हव्या आहेत.. या आणि अशा असंख्य पोस्ट मी वाचल्या होत्या. त्यामुळे अशी मुलाच्या शाळेचं प्रोजेक्ट करून मागणारी पोस्ट वाचली आणि मलाही ते इंटरेस्टिंग वाटलं. आतापर्यंत पीएचडीचे थिसिस विकत मिळतात माहिती होतं पण शालेय वयात असलेल्या मुलांच्या पालकांकडूही असं प्रोजेक्ट विकत घेण्याबद्दल विचारणा होत असेल, याची कल्पना नव्हती.

 

पोस्ट फक्त दोन ओळींचीच होती. पण त्यात मी वाचल्या तोपर्यंत शंभर तरी कमेंट्स आल्या होत्या. आणि यातही नकारात्मक जास्तच. म्हणजे, मुलांची शाळेची प्रोजेक्ट्स करण्यात पालकांचा कसा सहभाग असला पाहिजे आणि पालक – मूल या बॉंडिंगसाठीच शाळा सुद्धा असे उपक्रम राबवितात याचं समर्थन सगळ्यांनी केलं होतं. सगळं वाचल्यानंतर मलाही वाटलं, जाणवलं आणि पटलं सुद्धा. कारण, आई असो किंवा बाबा या दोघांनी मिळून अशा प्रोजेक्ट्सच्या निमित्त घालवलेला वेळ आणि त्यानंतर ते तयार झालेलं प्रोजेक्ट खूप जास्त छान असतं.

 

प्रत्येक शाळेमध्ये प्रोजेक्ट घरून करून आणण्याच्या ॲक्टिव्हिटी असतातच. फक्त प्रोजेक्टच नाही, तर अशा अनेक ॲक्टिव्हिटी असतात, ज्यात पालकांना सहभागी व्हावंच लागतं. सायन्ससारख्या विषयाचं एखादं प्रोजेक्ट करायचं म्हणजे मुलं त्यानिमित्ताने इंटरनेटवरून जास्तीची माहिती मिळवतात. आता इंटरनेट हे खूप सोपं हातातलं साधन आलं आहे. आम्हाला पूर्वी शाळेच्या लायब्ररीमध्ये बसून पुस्तकं शोधून माहिती गोळा करत होतो. आता इंटरनेटचं जाळं अनेकांचं काम सोपं करतं. मुलांनी माहिती गोळा केली की त्यातलं काय हवं, काय नको हे पालकांच्या मदतीने ठरवणं सोपं जातं. मग प्रोजेक्टसाठी लागणारे चार्ट, मॉडेल पालकांच्या मदतीनं मुलं करू शकतात. त्यासाठी घरातल्याच टाकाऊ वस्तूंचा खूप चांगला वापर होऊ शकतो. अशा वस्तूंचा पुनर्वापर कसा करायचा, याचीही यानिमित्तानं मुलांना माहिती होते. मिळालेल्या थीमसाठी कोणतं साहित्य लागेल, ते मिळवायचं कसं, घरातल्या कोणत्या टाकाऊ वस्तूचा कसा वापर करता येईल याचा विचार करणे, कापणे, चिकटवणे या सगळ्या लहान लहान गोष्टी मुलांना यातून शिकायला मिळतात.


 

मुलांमधल्या कल्पकतेला चालना मिळते. त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. पालक आणि मुलांना एकत्र मिळालेला वेळ ही बाब महत्त्वाची असतानाच नवनिर्मितीचा अनुभूती देणारी गोष्ट सुद्धा यातून घडते. नंतर अशी प्रोजेक्ट्स मुलं दीर्घकाळ लक्षात ठेवतात. त्यामुळे दुकानातून आणलेल्या एखाद्या रेडिमेड वस्तूपेक्षा अशा घरात केलेल्या प्रोजेक्ट्सचं महत्त्व नक्कीच जास्त असतं. मी वाचलेल्या सोशल मीडियाच्या पोस्टवर असलेल्या शेकडो कमेन्ट्समध्ये एक कमेंट माझ्या खूप चांगली लक्षात राहिली. त्या महिलेनं लिहिलं होतं की, ``मला तर जुळी मुलं आहेत. म्हणजे थीम एकच पण दोन मुलांना एकाच वर्गात प्रोजेक्ट करून देताना प्रत्येक वेळी वेगवेगळा विचार करावा लागायचा.`` खरंच हे खूप चॅलेंजिंग आहे. विषय एकच आणि तो दोन पद्धतीनं मांडण्याचं आव्हान इतकं आनंदानं स्वीकारणं, खूप कौतुक वाटलं सगळ्यांना. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून या स्त्रीचं सुद्धा कौतुक केलं.

 

पाल्याचे आई – वडील दोघंही नोकरदार असले तरीही मुलांच्या अशा छोट्या छोट्या आनंदासाठी आवर्जून वेळ काढणारे, त्यासाठी स्वतःचं काम, अन्य वेळा, कमिमेन्ट्स यांची तडजोड करणारे अनेक पालक आजही आजूबाजूला दिसतात. हाच पालकांनी मुलांसाठी काढलेला वेळ, मुलांच्यात मूल होऊन पालकांनी घेतलेला आनंद, मुलांसाठी स्वतःचं काम बाजूला ठेवून मुलाशेजारी बसणारे आई-बाबा असे सगळे क्षण मुलं दीर्घकाळ लक्षात ठेवत असतात. असा सगळा आनंद, हे क्षण विकतच्या प्रोजेक्ट्समध्ये नक्कीच मिळत नसतात. मग, प्रोजेक्ट विकत आणून आपण आपली सोय करून घ्यायची की थोडे कष्ट करून हे आनंदाचे क्षण त्यातून कमवायचे, हे आपणच ठरवायचं असतं.

 

सीमा देसाई

Friday, 6 November 2020

 गुपीत

अलिकडे कोणतीच गोष्ट गुपीत राहात नाही, असं वाटतंय. पूर्वी शाळेत मिळालेलं बक्षीस घरी येईपर्यंत स्वतःपुरतं गुपीतच असायचंकी.. घरी आल्यावर दप्तरातून काढून हळूच दाखवायचं मग आई खूष होणार.. त्यानंतर संध्याकाळी बाबा घरी येईपर्यंत हे गुपीत घरात गपचूप बसलेलं असायचं. मग बाबा आले.. हात पाय धुतले की त्यांचा चहाचा कप हातात येई पर्यंत आपणही हळूच पाठीमागे लपवून ते बक्षीस आणायचं आणि एकदाचं गुपीत उघड करायचं.. आता तुमच्या पोराला उद्या शाळेत बक्षीस मिळणार आहे.. असा मेसेज सुद्धा आदल्या दिवशी शाळेकडून येतो.. फुटलं गुपीत..

पूर्वी सरप्राइज म्हणून पाहुणे मंडळी अचानक घरी येऊन धडकायची.. आता घरी यायच्या आधी मेसेज करून परवानगी मागतात.. यात सरप्राइज उरलं नाही..

दिवसभरातल्या बातम्या बघण्यासाठी संध्याकाळच्या सात वाजण्याची वाट पहावी लागायची. आणि मग त्यातला शब्द अन् शब्द मोठ्या माणसांना ऐकायचा असायचा, मग आमच्यासारख्यांना चिडीचूप बसावं लागायचं. आता बातम्यांचंही गुपीत काही संध्याकाळपर्यंत टिकत नाही. हातातल्या मोबाईलवर ते सगळ्यात आधी टकटक करतं.. वाटलं तर वाचा नाहीतर सोडून द्या.. 

अशा सगळ्या गोष्टी आता अतिशय वेगाने पसरतात. क्षणार्धात..सरप्राइज, गुपीत, गंमत.. या सगळ्या शब्दांमधली देखील मजा हळूहळू संपत आल्यासारखी वाटतेय.. म्हणूनच अशीच एक गंमत म्हणून आम्ही घरात गेले अनेक दिवस अशी गुपीतं तयार करतोय. अगदी लहान लहान गोष्टीतून कसा आनंद मिळतो, हे मला यातून बघायला मिळालं.. खूप मजा आली. 

श्रावण, गणपती, नवरात्र सुरू झाल्यापासून काही ना काही गोडधोड पदार्थ सुरू होतेच. म्हटलं यातूनच गंमत करू. सखीला बोलावून सांगितलं, ``आज आपण मोदक करतोय. आपल्या दोघींचं सिक्रेट आहे. बाबांना सांगू नकोस.`` असं कानात सांगितल्याबरोबर चिमुकला हात तोंडावर ठेऊन गोड खुदूखुदू हसली आणि बाहेर पळाली.. आता ती पुढे काय करणार हे मला माहीत होतं. लगेच स्वयंपाकघरात येऊन मला म्हणाली, ``मी जरा बाबांशी बोलतेय.. पण आपलं सिक्रेट नाही सांगत.. असंच काहीतरी बोलायचंय मला..`` 

मी म्हटलं, ``बोल ना मग..``

मला म्हणाली, `तू आत्ता काय नाव सांगितलंस, ते तू आज करणारेस.. मोगद का काय तेच ना..?`` 

मी म्हटलं, ``हो.``

हॉलमधून खुसफूस कानगोष्टी केल्याचा आवाज आलाच आणि त्यात जोडीला तिचं खुदूखुदू हसणं.  आणि इतक्यात तिचे बाबा मोठ्याने म्हणालेच, ``अरे व्वा.. मोदक मिळणार आहेत !!``  

काहीच ऐकू न आल्यासारखं मी आतून म्हटलं, ``काय झालं..?`` 

दोघं लगेच सावरून घेत म्हणाले, ``काही नाही गं.. टिव्हीवर ते रेसिपी शो मध्ये मोदकांचा फोटो दाखवला ते बघून आम्ही बोलत होतो..`` 

मी हसले आणि आत गेले. (पुन्हा एकदा कानावर खळाळतं हास्य पडलं)  

आईचं आणि तिचं गुपीत परस्पर बाबांना सांगितल्याचा खूप आनंद होता तिच्या चेहऱ्यावर. गुपीत हे मनातल्या कुपीतच ठेवायचं असतं हे तिला माहीतच नाहिये अजून. तिला ते कधी एकदा बाबांना सांगतेय असं होत असतं. ते घरात नसतील आणि एखादी गोष्ट सिक्रेट आहे, ``सांगू नको`` म्हटलं की ही संध्याकाळपर्यंत घोकत राहते तो शब्द. आणि मग ते घरी आले की मला म्हणते, ``तूू जरा चहा कर बाबांना. मी थोडं बोलून येते त्यांच्याशी.`` 

(मला कळतं काय शिजतंय ते)

पण फार मज्जा आहे यात.. सध्याच्या काळात आमचं आम्ही सुरू केलेलं हे एक मनोरंजन. 

यात विलक्षण खळाळतं हास्य, लुकलुकते डोळे, चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि कधीतरी गुपीत फुटल्याचा आनंद आम्हाला बघायला मिळतो. 

 आता या सिक्रेट, सरप्राइज, गुपीत यातली गंमत वाटायला लागल्यापासून ``आज आपण आलू पराठे  सिक्रेट करूया का आपलं?``, असंही तिने मला विचारलंय. मग तिच्या समाधानासाठी ते आमच्या दोघींचंच त्या दिवसाचं गुपीत असतं. 

#गुपीत #सिक्रेट #सरप्राइज #सखीसंवाद

©️ सीमा देसाई

Saturday, 11 May 2019

माझी इवलीशी माय

चार दिवसांपूर्वीची गोष्ट.. सखीला केसाला तेल लावायला ये म्हणून सांगितलं. समोर बसवून तिच्या छोट्याशा केसांमधून हळूहळू बोटं फिरवत मी केस लावलं आणि दोन छोट्या पोनी घातल्या. माझं काम संपलं होतं. एखादी पटकन उठून गेली असती. मला म्हणाली, चल आता मी तुला तेल लावते. ती तेल लावणार म्हणजे.. चिमुकल्या बोटातून तेलाचे थेंब फरशीवर गळत माझ्या कपड्यांवर सांडत येणार या विचारानेच मी म्हटलं., नकोय मला. माझं मी लावेन नंतर. तर म्हणते, अगं तू मला तेल लावलंस ना, आता मी तुझी आई आहे. माझं ऐकायचं. मी पण तुझ्यासारखंच लावणार.

आणि अखेर तेलाच्या वाटीत तिने बोटं बुडवलीच. तसंच निथळतं बोट घेऊन माझ्या केसांच्या भांगांमध्ये फिरवायला सुरवात केली. आणि खरं सांगायचं तर अतिशय छान वाटलं. त्या चिमुकल्या बोटांमध्ये जोर नव्हता पण प्रेम खूप होतं. अगदी अलगद मायेने तिची बोटं माझ्या केसातून फिरत होती... माझ्या आईची आठवण करून देत. तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं, वय लहान असलं तरी स्त्री म्हणून अंतरातून येणारी माया, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी प्रत्येकीकडे आपसूकच असतात वाटतं. वयोपरत्वे त्याचं व्यक्त होणं बदलत असेल, समजूतदारपणा वाढत असेल. पण ठराविक वयात प्रेम निर्माण होतं किंवा वयाच्या एका टप्प्यावर आपुलकी वाटते असं नाहीये. ही लडिवाळ भावना मुलींमध्ये अगदी या चार वर्षाच्या वयात मी पाहिली. आणि आजच्या मदर्स डे निमित्त मला ही चार दिवसांपूर्वीची घटना पुन्हा एकदा आठवली.

सीमा सलीम देसाई
12 मे 2019

Friday, 11 August 2017

गंदबाबी बाप्पा...

मी स्वयंपाक घरात.. आणि हाॅलमधून जोरात लेकीची हाक आली.. आई गंदबाबी बाप्पा.. गंदबाबी बाप्पा.. सुरवातीला काहीच समजलं नाही. तिच्या अडीच वर्षाच्या बोबड्या बोलातून ती खूप काही तरी आनंदून सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण मला ते समजत नव्हतं. शेवटी. हातातलं काम सोडून मी हाॅलमध्येच थांबले. तिला जवळ  घेऊन दोन - तीन वेळा विचारलं.. तू काय म्हणतेस.. पुन्हा सांग.. वगैरे.. तिच्या ओठांच्या हालचालींवरून मी त्या गंदबाबी या शब्दाचा शोध घ्यायला लागले. पण काही केल्या संदर्भ लागेना.
इतक्यात झी मराठीवर चॅनेलचं प्रमोशनल साँग लागलं. पावसातून गणपती बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घरी आणतानाचं एक दृश्य त्यात आहे. ते पाहून ही पुन्हा जोरात म्हणाली.. आई गंदबाबी बाप्पा... तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.. गंदबाबी बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. आणि मगाचपासून तिला हेच सांगायचं होतं. सध्या चौकाचौकाच मंडळांची गणेशोत्सवाची पोस्टर्स लागलेली दिसतायत. शिवाय बऱ्याच लहानपणापासून गणपती बाप्पा ओळखता येतो पण आता म्हणता येतो तो सुद्धा असा.. गंदबाबी बाप्पा.. हे माझ्यासाठी नवीनच होतं. आतापर्यंत लहान मुलं गम्पती बाप्पा मोलया.. असं म्हणतात, हे माहीत होतं. पण आमच्या घरात गम्पती ऐवजी गंदबाबी बाप्पा आलेत, याचा आनंद आहे. या तिने अर्धवट ऐकलेल्या किंवा नीट ऐकलेल्या पण तिला उच्चारता न आल्याने बोबड्या बनणाऱ्या शब्दांची आता खूप गंमत वाटते. तिच्या अशा अनेक बोबड्या शब्दांची आता यादी करून ठेवाविशी वाटतेय.

सीमा सलीम देसाई

Monday, 22 May 2017

मोगरा फुलला..

तळपत्या उन्हात भयंकर तापलेल्या जमीनीवर वळवाच्या पावसाचे फक्त चार थेंब पडले तरी वातावरण सुखावून जातं. आसमंतात तो मातीचा दरवळ पसरवून तो पर्जन्य आपल्या येण्याची चाहूल देऊन जातो. आणि मग काही दिवसांनी पुन्हा झालेला पावसाचा शिडकावा मनाला आल्हाददायक करून जातो. तापलेल्या उन्हापासूनच फुलत आलेला मोगरा पुन्हा जोमाने बहरतो आणि काही काळासाठी सुखावून जातो. अगदी तसंच.. खूप दिवसांपासून वातावरण काहीस बिघडलेलं. वाढलेला उकाडा जगणंच असह्य करत होता. प्रत्येक वर्षी उकाडा असतोच ना. आणि त्यानंतर नेमेचि येतो मग पावसाळा.. पण या वर्षी सूर्यदेवांनी थोडी जास्तच परीक्षा पाहिली धरणीची. सूर्याच्याच किरणांचा आधार घेऊन धरणीवर फुललेल्या रोपट्यांची.. कोवळ्या फुलांची आणि मोगऱ्याचीही.

उकाडा सुरू झाल्यापासून तापू लागलेल्या धरणीवर असेच एकदा पावसाचा शिडकावा झाला. एक दीर्घ श्वास घेऊन त्या श्वासात तप्त धरणीवरच्या टपोऱ्या थेंबांमुळे निर्माण झालेला गंध भरून घ्यावासा वाटला. स्वतःच्या मनात साठवून ठेवावासा वाटला. अगदी कुठेतरी एखाद्या चोरकप्प्यात लपवावासा वाटला. म्हणजे स्वतः खेरीज तो बाकी कोणाला समजणार नाही. पण खरंच, तेव्हा तो लपवावासाच वाटला. पण हा दरवळ लपवून लपतो का सहज. अगदी जसा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा. कितीही आणि कुठेही लपवावा म्हटला तरी त्याचा दरवळ स्वतःच्या असल्याची जाणीव प्रत्येकाला करून देत राहतो.

त्या पावसाच्या सरींनी केलेल्या प्रेमाच्या शिडकाव्यामुळे थोडं अधिक उत्साहाने फुललेला मोगरा देखील भान विसरून दरवळू लागला. अबोल चाफा देखील न राहावून भरभरून बोलू लागला. खूप काही व्यक्त करून गेला. अगदी ग. दि. माडगूळकरांच्या शब्दांनी वर्णन केल्यासारखं.. म्हणजे, लपविलास तू हिरवा चाफा.. सुगंध त्याचा लपेल का.. प्रीत लपवूनी लपेल का.. आणि  खरंच आहे .. त्या पावसाचं आणि धरणीचं प्रेम याच क्षणी तर लक्षात येतं. त्याच्या येण्याने किंवा अगदी त्याच्या चाहुलीमुळे उत्साहित, प्रफुल्लित झालेली ती खुलून जाते. हरखून जाते. आणि तो येणार म्हणून साजशृंगार करायला घेते. तेव्हाच झाडं, वेली हिरवीगार होतात.. नवी पालवी फुटते.. आणि फुललेला मोगरा अधिक दरवळतो. गदिमा जसं पुढे म्हणतात की, जवळ मने पण दूर शरीरे..हे सगळंच अगदी खरं आणि तंतोतंत वाटतं. पण नेमकं हे क्षणिक असतंं का.. बहुदा नसतं. कारण हा श्वासात साठवावासा वाटणारा धरणी आणि पावसाच्या प्रेमाचा दरवळ हा पुढच्या भरभरून बरसणाऱ्या प्रेमधारांची चाहूल देऊन जात असतो. मी पुन्हा येणार आणि तेव्हा फक्त एखाद्या शिडकाव्यासाठी नाही तर त्या धरणीचं पुढचं आयुष्य अगदी सुखद करण्यासाठी येणार.. असंच जणू सांगत असतो.

सीमा सलीम देसाई 23 मे 2017

Friday, 16 May 2014

एक नवं जग.. आईसाठी...

आज माझ्या नावाने आईच्या पत्त्यावर एक पत्र आलं. सध्या ई-मेल आणि व्हॉट्स अॅपच्या जमान्यात माझ्यासाठी पोस्टकार्ड आलेलं पाहून आईला पण आश्चर्य वाटलं. सगळं पत्र वाचून कोणीही चक्रावून गेलं असतं. कधीच ध्यानी मनी नसलेल्या एका मुलीचं पत्र. हिची आठवण अगदीच येत नव्हती असं नाही. कधीतरी तीन-चार महिन्यातून हिचा विचार मनात डोकावून जायचा. पण तिच्याकडून कधी पत्र येईल अशी अपेक्षाच नव्हती. मुख्य म्हणजे, तिच्या मनात खदखदणाऱ्या आणि तिच्या हळव्या कोपऱ्यात तिच्या आईबद्दल असलेल्या काळजीच्या स्वरातून तिनं हे पत्र लिहीलं होतं. पत्र होतंं तर माझ्या नावाने पाठविलेलं पण ते माझ्या आईसाठी लिहिलं होतं. पत्र योग्य ठिकाणी पोहोचावं, या काळजीने माझं नाव हे फक्त माध्यम ठरलं. त्या मुलीच्या या हुशारीचं सुद्धा मला खूप कौतुक वाटलं.

पत्राची सुरवातच अशी होती,
प्रिय काकू, मला तुमचं नाव माहीत नाही. म्हणून मी सीमा ताईच्या नावे हे पत्र पाठवित आहे. मी जिथे आहे, तिथे आनंदात आहे. शिक्षण सुरू आहे. मी लवकरच माझ्या  पायावर उभी राहणार आहे. तेव्हा मी येऊन माझ्या आईला घेऊन जाणार आहे. माझी आई कशी आहे ते मला प्लीज या फोन नंबरवर दुपारी चार ते पाच या वेळेत कळवा. मी तुमच्या फोनची वाट पाहते.

पत्राची एक - एक ओळ वाचताना मन खूप हेलावून  जात होतं. या मुलीला आमच्याबद्दल फारसं काहीच माहीत नाही. सहावीपर्यंत ती आमच्या बिल्डिंगमध्ये रहायची. कोणत्याही शिकवणीशिवाय 95 टक्के मार्क मिळविणारी ही चुणचुणीत मुलगी तिच्या बुद्धिमत्तेमुळे आमच्या चांगलीच लक्षात होती. प्रत्येक परीक्षेचा निकाल लागला की प्रगतीपुस्तक घेऊन घरी दाखवायला यायची. मग घरात असेल ते गोड आई तिच्या हातावर ठेवत असे. कित्येकदा तिला शाळेचा युनिफॉर्म, वह्या-पुस्तकं देखील पुरेशी किंवा नवीन मिळाली नाहीत. तरीही तिनं तिचा टक्का सोडला नाही. सहावीनंतर ती अचानक दिसेनाशी झाली. तिच्या आईला मानसिक आजार होता. त्यामुळे मुलीच्या भविष्याच्या काळजीनं बहुतेक वडिलांनी त्यांच्याजवळ सांभाळण्यासाठी नेले. त्यानंतर पाच-सहा वर्षं ही मुलगी या ठिकाणी परतली नव्हती आणि आज अचानक पत्र आलं, ते काळजीपोटी आईची चौकशी करण्यासाठी.. सहाजिक होतं. कुठल्याही मुलीला आपल्या आईची एवढी काळजी नक्कीच असते. ती आईपासून कितीही दूर असली तरीही तिचं मन आईभोवती कायमच फिरत असतं. ते पुन्हा सिद्ध झालं. या पत्रातून आणखी एक गोष्ट लक्षात आली. या मुलीनं नऊ मे रोजी हे पत्र लिहिलं होतं. मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा होतो. यंदा दोन 11 मे रोजी साजरा झाला. त्यामुळे हिला आईची प्रकर्षानं आठवण झाली आणि तिनं हे पत्र पाठवलं, असाही विचार मनात आला.

या पत्राच्या प्रत्येक वाक्यातून आईला बरी करण्याची तिची जिद्द दिसत होती. भविष्यात लवकरच आपण स्वावलंबी व्हावं आणि आईची जबाबदारी घ्यावी, तिला सांभाऴावं.. असा विचार स्पष्ट होत होता. खरंतर तिची आई आता कधीच बरी होणार नाही, सामान्य लोकांसारखी राहणार नाही, हे आम्हालाही दिसत होतं. दिवसेंदिवस मानसिक आजारामुळे तिच्या आईचं वागळं अनेकांसाठी त्रासदायक ठरत होतं. पण हे सगळं या मुलीला फोनवर सांगणं आम्हाला कधीच शक्य नव्हतं. तिच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्याची ताकद या क्षणी निश्चित आमच्यात नव्हती. पण किमान तिला वास्तव समजेपर्यंत ही स्वप्नं मोडायची नाहीत, हे तरी ठरवलं होतं. आईच्या प्रेमापोटी तिची शिकण्याची, काम करण्याची जिद्द आम्हाला मोडायची नव्हती. आईसाठी तिनं रंगविलेली सुंदर स्वप्नं नि तिला नवीन जग दाखविण्याची इच्छा एक मुलगी म्हणून अधिकाधिक बळकट होवो आणि त्याला एक ना एक दिवस नक्कीच यश येवो, हीच सदिच्छा.

सीमा सलीम देसाई16 मे 2014

Tuesday, 8 April 2014

मेरी आवाज ही पहचान है...


१५ जानेवारी २०१४... चा दिवस. आकाशवाणीतून बाहेर पडताना एन्ट्री रजिस्टरमध्ये सकाळी साडेनऊ वाजता निघतानाची नोंद केली आणि त्याक्षणी हातातलं पेन थोडं जड झालं. गेली साधारण दहा वर्षं या ठिकाणी निर्माण झालेलं आवाजाशी नातं आता संपणार होतं. अर्थात काही दिवसांच्या खंडानंतर  ते पुन्हा जोडलं देखील गेलं असतं, पण आता जेव्हा जोडलं जाईल, तेव्हा माझी ओळख बदललेली असेल. आवाज तोच असला तरी आतापर्यंत ज्या नावामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखत होता, त्यात नक्कीच बदल झालेला असेल.



पुणे केंद्रावरच्या प्रादेशिक बातम्यांसाठी सीमा शेख हे नाव खूप परिचित झालेलं होतं. प्रकर्षानं नाव आणि आडनाव यामुळे लोकांच्या ते जास्तच चांगलं लक्षात रहात होतं. गेली अनेक वर्षं या नावाचं आणि आवाजाचं लोकांनी कौतुकही केलं. तेव्हाच खरंतर या आवाजाचं महत्त्व समजलं. अजूनही आठवतोय, आकाशवाणीतला पहिला दिवस. युववाणीसाठी काम करायचं म्हणून विभागप्रमुख प्रतिमा कुलकर्णी यांना भेटायला गेले होते. त्यांचा सहकारी आणि कालांतराने माझ्या चांगल्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या अमोल जोशी याच्याशी आधी भेट झाली. तो मला स्टुडिओमध्ये घेऊन गेला. दोन भली मोठ्ठी दारं उघडून स्टुडिओमध्ये प्रवेश करणं माझ्यासाठी अवघडच होतं. प्रतिमा मॅडम एका कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करत होत्या. परदेशी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाषेबद्दलचे अनुभव आणि भाषेची आवड यासंदर्भातला कार्यक्रम होत्या. मी एस.पी. कॉलेजमध्ये तेव्हा अकरावीत शिकत असेन. मी जर्मनचा अभ्यास करत होते. माझ्याशी बोलताना हे समजल्यावर त्या म्हणाल्या, वा..छानच...मी याच विषयावर काम करते आहे. चल, जा समोर स्टुडिओमध्ये. तुझे अनुभव रेकॉर्ड करू. म्हणजे, व्हॉइस क्वालिटी समजेल. स्टुडिओतला माझा पहिला अनुभव. खूप छान होता आणि तो ओके झाला. माझ्या बाइटनंतर माझं आवडतं गाण कोणतं म्हणून विचारण्यात आलं. आशाताईंची गझल ऐकवा म्हणून सांगितलं. सलोना सा सजन है.. और मै हूं... ही गझल लावण्यात आली. ऑन एअरसुद्धा हा कार्यक्रम खूप छान वाटला. हा रेकॉर्डेड कार्यक्रम मी बसमध्ये वॉकमनवर ऐकला होता. आणि इथूनच आवाजाशी नातं जडलं ते कायमचंच. या छोट्याशा रेकॉर्डिंगनंतर युववाणीतला प्रवास सुरू झाला. अनेक मुलाखती, चर्चा, गप्पांचे कार्यक्रम केले. यानिमित्ताने अनेक मोठ्या लोकांशी भेटी झाल्या. कालांतराने मला युववाणीसाठी पूर्णवेळ काम करणं शक्य नव्हतं. पण तरीही प्रतिमा मॅडमनी क्रमशः पुस्तक वाचनाची संधी दिली. राजेंद्रसिंह यांनी केलेल्या कामाचं जोहड या पुस्तकाचं क्रमशः वाचन मी केलं. खूप दिवस हा कार्यक्रम सुरू होता. त्यावरही अनेकांच्या उत्तमोत्तम प्रतिक्रिया आल्या.

चार वर्षांनी ग्रॅज्युएशन झाल्यावर वृत्तविभागात काम करायचं ठरवंलं. त्यामुळे तिथली एन्ट्रन्स, व्हॉइस टेस्ट दिली आणि काम सुरू झालं. काम करण्याची वेळ देखील निराळीच होती. पहाटे चार वाजता. सकाळी ता वाजून पाच मिनिटांचं बातमीपत्र.. म्हणजे चार वाजता काम सुरू. घरातून बाहेर पडल्यावर आजूबाजूचं निवांत झोपलेलं जग पहायचं आणि आपल्याकामासाठी बाहेर पडायचं. असं सुरवातीचे काही दिवस झालं. पण काही दिवसांनी या कामाच्या वेळेची सवय झाली आणि याच वेळेतलं काम आवडू लागलं. म्हणता म्हणता.. या कामाशी आठ ते दहा वर्षं कशी जोडली गेली ते समजलं नाही. लोकांपर्यंत दहा मिनिटे लाइव्ह आवाज नेण्याचा हा अनुभव अतिशय वेगळा होता. रेडिओवर ऐकणाऱ्यांना हे सगळं फार सोपं वाटत असतं. पण प्रत्यक्षात काम करणाऱ्यांना इथल्या कसरतीचा अनुभव असतो. कित्येकदा घड्याळातली सेकंदाची वेळ कशी निघून जाते हे आपल्याला समजतही नाही. पण आकाशवाणीत काम करताना सेकंदाचं महत्त्व समजलं. ठरलेल्या वेळेपेक्षा काही सेकंद बातम्या संपण्याची वेळ लांबली तर किती अडचणी निर्माण होऊ शकतात, हे जवळून पाहिलंय. आकाशवाणीच्या न्यूज रूममधलं ऑन एअर काम करणं, म्हणजे खरोखरंच खूप चॅलेंजिंग. टाइम मॅनेजमेंट, डिसिजन मेकिंग, न अडखळता, आवाजात कोणताही खर न आणता सलग दहा मिनिटे बातम्या वाचणं... वाचणं पेक्षा सांगण.. हा शब्द जास्त योग्य आहे. तसंच बातमी कोणतीही असली तरी आपण त्या विषयाच्या भावनेत न गुंतता तटस्थ राहून ऑन एअर काम करणं.. अशा अनेक गोष्टी या निमित्ताने शिकायला मिळाल्या. काही तांत्रिक गोष्टींची भर पडली आणि इथे काम करणं अधिकाधिक आवडू लागलं. काचेच्या बंदिस्त स्टुडिओमध्ये घडणारे अनेक किस्से कामातला अनुभव समृद्ध करणारे ठरले. स्टुडिओमध्ये काम करताना बाहेरच्या जगाशी संपर्क न राहता देखील जगात काय चाललंय, हेच स्टुडिओ बाहेरच्या लोकांना बातम्यांच्या माध्यमातून सांगण्याचा अनुभव वेगळा होता. काही दिवसांच्या खंडानंतर हे दिवस पुन्हा अनुभवता येतील, असा प्रयत्न आहे.

सीमा सलीम देसाई