Tuesday, 20 February 2024

शाळेचं प्रोजेक्ट विकत घेतात?

 





काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली. एका आईनं आठ वर्षाच्या मुलासाठी लागणारं एक प्रोजेक्ट रेडिमेड मिळेल का, याची विचारणा केली होती. खरंतर प्रोजेक्टचा विषय फार अवघड नव्हता. पण ते शाळेच्या प्रदर्शनात ठेवायचं असल्यामुळे तो बाहेरून कोणी करून देईल का, आणि त्याची किंमत सांगा, असं विचारलं. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर घर भाड्याने मिळेल, सकाळच्या स्वयंपाकासाठी मावशी मिळतील का किंवा लग्नासाठी रुखवत करून हवं आहे, वास्तुशांतीसाठी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वस्तू हव्या आहेत.. या आणि अशा असंख्य पोस्ट मी वाचल्या होत्या. त्यामुळे अशी मुलाच्या शाळेचं प्रोजेक्ट करून मागणारी पोस्ट वाचली आणि मलाही ते इंटरेस्टिंग वाटलं. आतापर्यंत पीएचडीचे थिसिस विकत मिळतात माहिती होतं पण शालेय वयात असलेल्या मुलांच्या पालकांकडूही असं प्रोजेक्ट विकत घेण्याबद्दल विचारणा होत असेल, याची कल्पना नव्हती.

 

पोस्ट फक्त दोन ओळींचीच होती. पण त्यात मी वाचल्या तोपर्यंत शंभर तरी कमेंट्स आल्या होत्या. आणि यातही नकारात्मक जास्तच. म्हणजे, मुलांची शाळेची प्रोजेक्ट्स करण्यात पालकांचा कसा सहभाग असला पाहिजे आणि पालक – मूल या बॉंडिंगसाठीच शाळा सुद्धा असे उपक्रम राबवितात याचं समर्थन सगळ्यांनी केलं होतं. सगळं वाचल्यानंतर मलाही वाटलं, जाणवलं आणि पटलं सुद्धा. कारण, आई असो किंवा बाबा या दोघांनी मिळून अशा प्रोजेक्ट्सच्या निमित्त घालवलेला वेळ आणि त्यानंतर ते तयार झालेलं प्रोजेक्ट खूप जास्त छान असतं.

 

प्रत्येक शाळेमध्ये प्रोजेक्ट घरून करून आणण्याच्या ॲक्टिव्हिटी असतातच. फक्त प्रोजेक्टच नाही, तर अशा अनेक ॲक्टिव्हिटी असतात, ज्यात पालकांना सहभागी व्हावंच लागतं. सायन्ससारख्या विषयाचं एखादं प्रोजेक्ट करायचं म्हणजे मुलं त्यानिमित्ताने इंटरनेटवरून जास्तीची माहिती मिळवतात. आता इंटरनेट हे खूप सोपं हातातलं साधन आलं आहे. आम्हाला पूर्वी शाळेच्या लायब्ररीमध्ये बसून पुस्तकं शोधून माहिती गोळा करत होतो. आता इंटरनेटचं जाळं अनेकांचं काम सोपं करतं. मुलांनी माहिती गोळा केली की त्यातलं काय हवं, काय नको हे पालकांच्या मदतीने ठरवणं सोपं जातं. मग प्रोजेक्टसाठी लागणारे चार्ट, मॉडेल पालकांच्या मदतीनं मुलं करू शकतात. त्यासाठी घरातल्याच टाकाऊ वस्तूंचा खूप चांगला वापर होऊ शकतो. अशा वस्तूंचा पुनर्वापर कसा करायचा, याचीही यानिमित्तानं मुलांना माहिती होते. मिळालेल्या थीमसाठी कोणतं साहित्य लागेल, ते मिळवायचं कसं, घरातल्या कोणत्या टाकाऊ वस्तूचा कसा वापर करता येईल याचा विचार करणे, कापणे, चिकटवणे या सगळ्या लहान लहान गोष्टी मुलांना यातून शिकायला मिळतात.


 

मुलांमधल्या कल्पकतेला चालना मिळते. त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. पालक आणि मुलांना एकत्र मिळालेला वेळ ही बाब महत्त्वाची असतानाच नवनिर्मितीचा अनुभूती देणारी गोष्ट सुद्धा यातून घडते. नंतर अशी प्रोजेक्ट्स मुलं दीर्घकाळ लक्षात ठेवतात. त्यामुळे दुकानातून आणलेल्या एखाद्या रेडिमेड वस्तूपेक्षा अशा घरात केलेल्या प्रोजेक्ट्सचं महत्त्व नक्कीच जास्त असतं. मी वाचलेल्या सोशल मीडियाच्या पोस्टवर असलेल्या शेकडो कमेन्ट्समध्ये एक कमेंट माझ्या खूप चांगली लक्षात राहिली. त्या महिलेनं लिहिलं होतं की, ``मला तर जुळी मुलं आहेत. म्हणजे थीम एकच पण दोन मुलांना एकाच वर्गात प्रोजेक्ट करून देताना प्रत्येक वेळी वेगवेगळा विचार करावा लागायचा.`` खरंच हे खूप चॅलेंजिंग आहे. विषय एकच आणि तो दोन पद्धतीनं मांडण्याचं आव्हान इतकं आनंदानं स्वीकारणं, खूप कौतुक वाटलं सगळ्यांना. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून या स्त्रीचं सुद्धा कौतुक केलं.

 

पाल्याचे आई – वडील दोघंही नोकरदार असले तरीही मुलांच्या अशा छोट्या छोट्या आनंदासाठी आवर्जून वेळ काढणारे, त्यासाठी स्वतःचं काम, अन्य वेळा, कमिमेन्ट्स यांची तडजोड करणारे अनेक पालक आजही आजूबाजूला दिसतात. हाच पालकांनी मुलांसाठी काढलेला वेळ, मुलांच्यात मूल होऊन पालकांनी घेतलेला आनंद, मुलांसाठी स्वतःचं काम बाजूला ठेवून मुलाशेजारी बसणारे आई-बाबा असे सगळे क्षण मुलं दीर्घकाळ लक्षात ठेवत असतात. असा सगळा आनंद, हे क्षण विकतच्या प्रोजेक्ट्समध्ये नक्कीच मिळत नसतात. मग, प्रोजेक्ट विकत आणून आपण आपली सोय करून घ्यायची की थोडे कष्ट करून हे आनंदाचे क्षण त्यातून कमवायचे, हे आपणच ठरवायचं असतं.

 

सीमा देसाई

No comments: