तळपत्या उन्हात भयंकर तापलेल्या जमीनीवर वळवाच्या पावसाचे फक्त चार थेंब पडले तरी वातावरण सुखावून जातं. आसमंतात तो मातीचा दरवळ पसरवून तो पर्जन्य आपल्या येण्याची चाहूल देऊन जातो. आणि मग काही दिवसांनी पुन्हा झालेला पावसाचा शिडकावा मनाला आल्हाददायक करून जातो. तापलेल्या उन्हापासूनच फुलत आलेला मोगरा पुन्हा जोमाने बहरतो आणि काही काळासाठी सुखावून जातो. अगदी तसंच.. खूप दिवसांपासून वातावरण काहीस बिघडलेलं. वाढलेला उकाडा जगणंच असह्य करत होता. प्रत्येक वर्षी उकाडा असतोच ना. आणि त्यानंतर नेमेचि येतो मग पावसाळा.. पण या वर्षी सूर्यदेवांनी थोडी जास्तच परीक्षा पाहिली धरणीची. सूर्याच्याच किरणांचा आधार घेऊन धरणीवर फुललेल्या रोपट्यांची.. कोवळ्या फुलांची आणि मोगऱ्याचीही.
उकाडा सुरू झाल्यापासून तापू लागलेल्या धरणीवर असेच एकदा पावसाचा शिडकावा झाला. एक दीर्घ श्वास घेऊन त्या श्वासात तप्त धरणीवरच्या टपोऱ्या थेंबांमुळे निर्माण झालेला गंध भरून घ्यावासा वाटला. स्वतःच्या मनात साठवून ठेवावासा वाटला. अगदी कुठेतरी एखाद्या चोरकप्प्यात लपवावासा वाटला. म्हणजे स्वतः खेरीज तो बाकी कोणाला समजणार नाही. पण खरंच, तेव्हा तो लपवावासाच वाटला. पण हा दरवळ लपवून लपतो का सहज. अगदी जसा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा. कितीही आणि कुठेही लपवावा म्हटला तरी त्याचा दरवळ स्वतःच्या असल्याची जाणीव प्रत्येकाला करून देत राहतो.
त्या पावसाच्या सरींनी केलेल्या प्रेमाच्या शिडकाव्यामुळे थोडं अधिक उत्साहाने फुललेला मोगरा देखील भान विसरून दरवळू लागला. अबोल चाफा देखील न राहावून भरभरून बोलू लागला. खूप काही व्यक्त करून गेला. अगदी ग. दि. माडगूळकरांच्या शब्दांनी वर्णन केल्यासारखं.. म्हणजे, लपविलास तू हिरवा चाफा.. सुगंध त्याचा लपेल का.. प्रीत लपवूनी लपेल का.. आणि खरंच आहे .. त्या पावसाचं आणि धरणीचं प्रेम याच क्षणी तर लक्षात येतं. त्याच्या येण्याने किंवा अगदी त्याच्या चाहुलीमुळे उत्साहित, प्रफुल्लित झालेली ती खुलून जाते. हरखून जाते. आणि तो येणार म्हणून साजशृंगार करायला घेते. तेव्हाच झाडं, वेली हिरवीगार होतात.. नवी पालवी फुटते.. आणि फुललेला मोगरा अधिक दरवळतो. गदिमा जसं पुढे म्हणतात की, जवळ मने पण दूर शरीरे..हे सगळंच अगदी खरं आणि तंतोतंत वाटतं. पण नेमकं हे क्षणिक असतंं का.. बहुदा नसतं. कारण हा श्वासात साठवावासा वाटणारा धरणी आणि पावसाच्या प्रेमाचा दरवळ हा पुढच्या भरभरून बरसणाऱ्या प्रेमधारांची चाहूल देऊन जात असतो. मी पुन्हा येणार आणि तेव्हा फक्त एखाद्या शिडकाव्यासाठी नाही तर त्या धरणीचं पुढचं आयुष्य अगदी सुखद करण्यासाठी येणार.. असंच जणू सांगत असतो.
सीमा सलीम देसाई 23 मे 2017