१६ मार्च २०१३ ला एक वर्ष झालंय. गेली अनेक वर्षे आपापल्या वर्तमानपत्रात काम करत होतोच पण असाइनमेंट्सच्या शिवाय एकमेकींना भेटणं शक्य होत नव्हतं. पण आता पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माध्यमातून ते अगदी सहज शक्य झालं.
कोणत्याही चार महिला एकत्र येऊन फार दिवस एकत्र राहू शकत नाहीत, असे म्हणतात. पण आम्ही १५ जणींनी ते खूप सहज शक्य करून दाखवलं आणि या पुढच्या काळातही ते तसंच कायम राहील याची खात्री आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये विविझ वर्तमानपत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्र यावं आणि काही उपक्रम राबवावेत, असा विचार खूप दिवसांपासून सुरू होता. मात्र, याला मूर्त रूप देण्यासाठी पुढाकार घेतला तो आमची मैत्रीण निशा पाटील हिने. याची सुरूवात झाली ती मागील वर्षीच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने.
या दिवशी निशाचा अचानक सगळ्यांना फोन आला. या वर्षीचा फ्रेंडशिप डे माझ्याकडे साजरा करू या. आम्हालाही एकत्र येण्यासाठी निमित्त हवंच होतं. संध्याकाळी आम्ही सगळ्या मैत्रीणी तिच्याकडे जमलो आणि फ्रेंडशिप डे मजेत साजरा झाला. त्यानंतर हळूहळू काही ना काही निमित्ताने आम्ही भेटत राहिलोच. अशा भेटींमधूनच महिलांचा पत्रकार संघ सुरू करावा, अशी कल्पना पुढे आली आणि त्याला सगळ्याच मैत्रिणींनी पाठिंबा दर्शविला. निशा, मी, सायली कुलकर्णी, अर्चना दहिवाल, संगीता तरडे, स्मिता जोशी, मनिषा जोशी, रजनी पाटील, दिपाली बोरवे, अम्रपाली गायकवाड, लीना माने, संगीता कांबळे, स्वाती देशपांडे, आशा साळवी, संध्या टोमके, मनिषा थोरात, विजेता गवस, प्रणिता भालेराव, रेश्मा कुसाळकर, चैत्राली राजापूरकर आणि अमृता ओंबाळे... अशी एकेक नावे जमायला लागली. मग सुरवात झाली हे सगळं कसं आणि नेमकं काय करायचं. संघ सुरू करायचा म्हणजे ही प्रक्रिया कायम सुरू राहिली पाहिजे, हे महत्त्वाचं होतं. संघ सुरू केला आणि आणि कालांतराने उत्साह बारगळला असे करून चालणार नव्हते. त्यामुळे खूप विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आणि मुख्य म्हणजे निशा या निश्चयावर ठाम होती.
महिलांचा पत्रकार संघ सुरू करायचा यामध्ये आम्ही सगळ्यांत वेगळा विचार असा केला की, पत्रकार म्हणून काम करणाऱ्या महिलांखेरीज ज्या महिला वृत्तपत्रांमध्ये काम करीत आहेत, त्यांचाही यामध्ये समावेश असेल. प्रथमतः आम्ही सगळ्या महिला सोडून अन्य व्यक्तींनाच ही गोष्ट रुचली नव्हती. मात्र, ज्यांच्यासाठी हा संघ नव्हताच, त्यांची मते विचारात घेण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही आमच्या मतावर ठाम होतो. आम्हाला मैत्रिणी करायच्या होत्या. संघटना करायची होती. एक अखंड राहणारी साखळी गुंफायची होती. त्यामुळे मधुरांगण, सखी मंच यामध्ये काम करणाऱ्या तसेच पेजिनेशन, जाहिरात विभाग यासाठी काम करणाऱ्या महिलांनाही सामावून घेण्याचे निश्चित झाले.
शहरात महिला पत्रकार संघाची स्थापना होणार याची बातमी पसरली आणि असंख्य वेगवेगळ्या प्रतिक्रिया कानावर आल्या. महिलांच्या वेगळ्या संघाची गरजच काय, इथपासून बघू किती दिवस चालतोय संघ… अशी अनेक वाक्ये ऐकायला मिळाली. या उलट आमच्याच क्षेत्रातील अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊ केले. याचं कौतुक वाटलं. त्यामुळे अर्थातच आमचा आत्मविश्वास वाढला. मला असं वाटतं की, एखादं चांगलं काम करायचं असेल तर सकारात्मक पेक्षा नकारात्मक गोष्टींचा विचार आगोदर व्हावा. आम्हीही तेच केलं. आणि अंतिमतः आम्हाला हे काम करायचंच आहे, हे ठरवून उचललेलं पाऊल पुढे टाकलं.
अजूनही आठवतंय.. आम्हाला मिटिंग घेण्यासाठी जागा नव्हती. म्हणून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील उद्यानात आम्ही भेटत होतो. त्यानंतर एकदा संघाबाबत चर्चा करण्यासाठी १६ मार्चला भेटायचे आहे, असा निरोप मिळाला आणि कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सहकार्याने त्यांच्या कार्यालयाच्या गच्चीवर आमच्या मैत्रिणींची मिटिंग सुरू झाली. निशाला मदत म्हणून मिटिंगची मिनिट्स, उपस्थितीची नोंद या सगळ्या कामांना मी सुरवात केली होती. आणि हे सगळे सुरू असताना सर्वांत मोठे आश्चर्य म्हणा, विश्वास म्हणा किंवा काहीही.. अध्यक्ष म्हणून तू काम पहायचं.. असं निशाने माझ्याकडे बघून सांगितलं. आणि या वाक्याला रितसर मिटिंगच्या भाषेत म्हणतात तसं प्रस्ताव, अनुमोदन एकेकीने देऊन सगळ्यांनी माझा बकरा केला, हे समजलं होतं. खरंतर सामान्यपणे हा आनंद होण्याचा क्षण असतो. मात्र, माझ्यासाठी तो कधीच नव्हता. खूप टेन्शन, अनपेक्षित घटना आणि मैत्रिणींकडूनच झालेले टार्गेट या सगळ्याची क्षणात जाणीव झाली. अर्थात या ठिकाणी टार्गेट हा शब्द खूप चांगल्या अर्थाने आहे. त्यांच्या माझ्यावरचा विश्वास दिसून आला. आणि या सगळ्याचे नियोजन पूर्वीच झाले असल्याची कल्पनाही लगेचच आली म्हणता म्हणता वर्षं कसं संपलं समजलंच नाही. संघाच्या सदस्यांची आरोग्य तपासणी, शुद्धलेखन, कार्यशाळा, दोन आनंददायी सहली, इंग्रजी संभाषण वर्ग, आरोग्य विषयक व्याख्यान, कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी चार दिवसांचे निर्भय बना.. अभियान या सगळ्या गोष्टी सहज आणि सुविहीत होत गेल्या ते प्रत्येकीच्या सहकार्यामुळेच. त्याशिवाय हा पल्ला गाठणे शक्य नव्हते. बघू किती दिवस एकत्र आहेत, असा विचार करणाऱ्यांसाठी आमच्या संघाची वर्षपूर्ती हे निश्चित चोख उत्तर असेल. हा अंक प्रसिद्ध होईपर्यंत आमच्या संघाची दुसरी कार्यकारिणी कदाचित जाहीर झालेली असेल आणि दुसऱ्या वर्षाची घोडदौडही सुरू झाली असेल, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी…
सीमा शेख
(महिला दिनानिमित्त एका अंकासाठी लिहिलेला लेख)
No comments:
Post a Comment