Wednesday, 24 April 2013

अजूनही आशा आहे...

एखादं आयुष्य उद्ध्वस्त होणं, म्हणजे काय असतं ते मी खूप जवळून पाहिलंय. जे पाहिलंय त्यापेक्षा वाईट एखाद्याच्या आयुष्यात काहीच असू शकत नाही असं वाटतं. आणि तिचं आयुष्य अजूनही तसंच चाललंय. आला दिवस ढकलायचा, दुसरं काही नाही. कारण, आता सगळी दारं बंद झाली आहेत. स्वतःहून टाकलेलं पाऊल मागे घेता येत नाही आणि मागे घेतलंच तर ते टेकविण्यासाठी टिचभर हक्काची जागादेखील उरलेली नाही. आई, वडील, भाऊ सगळ्यांनीच पाठ फिरवलेली. त्यामुळे पदरी आलेल्या आयुष्याला सामोरं जाणं, या पलिकडे ती आता काहीच करू शकत नाही. गेली २० वर्षं फक्त घरातच राहिलेली. क्वचित कधीतरी बाहेर जायचं. सणवार नाहीत की लग्नसमारंभही नाहीत...

आता जवळपास चाळीशीची ती. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी. आमची पहिली भेट कशी झाली ते देखील आठवत नाही. आम्ही कधी फार भेटलोही नाही. पण आमची मैत्री फोनवरची जास्त. एकदा केलेला फोन किमान वीस मिनिटे चालणार आणि मग गेल्या कित्येक दिवसातल्या गोष्टींचं शेअरिंग यानिमित्ताने होतं. ती मूळची खेड्यातली. कदाचित दोन्ही भावांची शहरातली नोकरी, तिचंही लग्नं शहरात झालेलं म्हणून ती पुण्याकडे आली असावी. गावतल्याच मुलाशी घरच्यांनी बघून करून दिलेलं लग्न. चूक एकच की त्या मुलाची आणि कुटुंबियांची पुरेशी माहितीच काढली नाही आणि वडीलधाऱ्यांनी हिचं लग्नं घाईघाईने उरकूनच टाकलं म्हणायचं. अर्थात, शिक्षणंही तिथंच थांबलं. पण किमान तिच्या हातात पदवी होती.

लग्न झाल्यावर ती पुण्यात आली. पहिले काही दिवस चांगले गेले असावेत. पण थोड्याच दिवसात नवरा विचित्र वागायला लागला. घरी वेळेवर यायचं नाही, तिच्या हातचं जेवायचं नाही, तिच्याशी शब्दानेही संवाद ठेवायचा नाही.  आणि एक दिवस अचानक तो घरातून जो गेला तो अजूनपर्यंत परत आलेला नाही. या गोष्टीला आता माझ्या अंदाजाने १२ ते १५ वर्षं झाली असतील. आज येईल, उद्या येईल म्हणून ती वाट पहात राहिली. संवादासाठी बोलणं नव्हतं त्यामुळे भांडण करून निघून गेलाय असंही नव्हतं.

काही दिवसांनी तिनं घरातली कपाटं सहज पाहिली तर त्याच्या माहितीच्या पुराव्याचा एकही कागद त्याने घरात ठेवला नव्हता. रेशनकार्डासहित ओळखीसाठी लागणाऱ्या सगळ्या पुराव्यांनिशी त्याने घर सोडलं होतं. तिला तसंच वाऱ्यावर टाकून. तिला आधार द्यायचा सोडून तिच्या माहेरच्यांनी तिलाच दोषी ठरवायला सुरवात केली. बहुदा त्यांनंतरचे काही दिवस भावाकडे राहिली. पण त्याचाही संसार सुरू झालेला. त्याच्यात अडचण नको म्हणून भावाने दोन खोल्यांचा त्याचा फ्लॅट तिला देऊ केला. त्यातंच तिचं विश्व तयार झालं. दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस काय असतात, हे तिला आता समजायला लागलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. गावी जाऊन त्याचा शोध घेतला. माहिती काढल्यावर समजलं की त्याच्या घरात आई मानसिक विकृत होती. बहुदा हा देखील तसाच. आणि याच्याशी लग्न केल्याबद्दल गावतल्यांनी हिलाच वेड्यात काढलं. पोलिसांत तक्रार दिली पण उपयोग झाला नाही. त्याचा शोध लागला नाही. मित्र, नातेवाईक सगळीकडे चौकशी केली. अखेर किती वर्षं एकटं रहायचं म्हणून पुनर्विवाहाचा विचार तिच्या मनात आला. त्यासाठी घटस्फोट होणं आवश्यक होतं. पण तिनं घटस्फोटाचा विषय काढला म्हणून माहेरच्यांनी तिची साथ सोडली. `तुला काय करायचं ते तुझं तू बघ..` असं म्हणून जणू तिला वाऱ्यावरच सोडलं.

शेवटी तिनंच धाडस केलं आणि फॅमिली कोर्ट गाठलं. घटस्फोटाची प्रक्रिया विचारली. तेव्हा पुन्हा एकदा त्याचा शोध घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. त्याची माहिती सरकारी कार्यालयांमध्ये पाठविण्यात आली. तेव्हा समजलं की त्याच्या नावे पासपोर्ट काढला गेला आणि अबूधाबीच्या व्हिसावर तो देश सोडून निघून गेला होता. घटस्फोटासाठी त्याला नोटिसा पाठवायला सुरवात झाली. समन्स बजावला. तो उत्तर देईना. मग कायद्यातील तरतूदीनुसार, तीन वेळा नोटीस पाठवूनही हजर न झाल्याने हिच्याबाजूने एकतर्फी घटस्फोट देण्यात आला आणि हिचा मार्ग मोकळा झाला. आता पुन्हा एकटी बाई म्हणून समाजात राहण्याचं दडपण. इतके दिवस गळ्यातल्या मंगळसूत्राचा तरी आधार होता. आता तेही नाही. स्थळं बघण्यासाठी नाव नोंदवलं तरी तिथे गैरफायदा घेणारेच अनेक. अखेर ओळखीतूनच एकजण भेटला. पहिल्या भेटीत तिला चांगला वाटला. लेकीचं आयुष्य आता सावरतंय असं म्हणून तरी आई-बापानं तिच्या आनंदात सामील व्हावं, तर तसंही नाही. `कर तू.. तुला काय करायचं ते..` असं म्हणून त्यांनी पुन्हा हात झटकले. अखेर तिनं तिच्या हिमतीवर निर्णय घेतला. दोघांनी आळंदीत लग्नं केलं.

मला वाटलं, आता हिचं आयुष्य सुरळीत होईल. गेली १२ वर्षं दोन खोल्यांच्या घरात टीव्हीशिवाय केवळ घरातलं काम आणि लायब्ररीच्या पुस्तकांच्या आधारे निम्म आयुष्य घालविल्यावर तिच्या वाट्याला सुखाचे चार दिवस तरी येतील. पण एखाद्याच्या आयुष्यात सुख हेलकावणी देतं, ते असं... हिच्या आयुष्यासारखं. दुसरं लग्नं झाल्यासरशी भावानं तिचं राहतं घर कोणालातरी भाड्याने देऊन टाकलं. ती नवीन घरात लक्ष्मी बनून गेली. पण तो देखील असाच विचित्र, विक्षिप्त निघालाय. कामानिमित्त २-२ दिवस घरी येत नाही. आला तरी चार दिवस बरा वागतो, पुन्हा पालथ्या घड्यावर पाणी. आयुष्यं कुठंतरी स्थिरावतंय असं म्हणताच त्याची घडी विस्कटायला लागते. मोठा फ्लॅट असून उपयोग काय. ही पुन्हा एकटीच. आता सोबतीला टीव्ही तरी आहे. अशा एकट्या राहण्यानं तिला आजारपण येतंय. पूर्वीपासूनच संधीवाताचा त्रास आणि बरेच काही लहान-मोठे विकार जडले आहेत. मात्र, सुखाच्या आशेने जे पाऊल उचललं ते देखील फसलेलं पाहताना बऱ्या होणाऱ्या व्याधी अजूनच ग्रासतायत आणि या सगळ्यात तिचं मन जास्तच आजारी होतंय. आता मात्र, ती उद्ध्वस्त झालीये. आयुष्यातलं एकटेपण आणि एकट्यानं आयुष्यं जगणं या दोन्ही गोष्टी तिचा पाठलाग सोडत नाहीयेत. सुरळीत चाललेल्या जीवनाच्या गाडीने नितांत सुंदर प्रवास करावा, लखलखीत स्वप्नांची उधळण करावी.. यापासून ती कोसो दूर आहे.. पण अजूनही आशा आहे.. कधीतरी हे बदलावं...आणि त्याच आशेवर ती जगत आहे..

बुधवार, २४ एप्रिल २०१३
सीमा शेख

No comments: