Sunday, 4 August 2013

पुरुषसत्ताक म्हणजे पत्नीवर सत्ता नव्हे…


कौटुंबिक हिंसाचार हा विषय नवीन नाही. बायकोला मारणे हा प्रकार समाजातल्या निम्नस्तरात अगदी सर्रास होत असताना आता उच्चभ्रू कुटुंबांमध्येही सहजरित्या घडत आहेत. फरक एवढाच की निम्नस्तरातल्या महिला या गोष्टी उघडपणे बोलून दाखवतात आणि उच्चभ्रू कुटुंबातील महिला याची वाच्यता होऊ देत नाहीत. पण समाजात पुरुषसत्ताक पद्धती मान्य असण्याचा अर्थ पत्नीवर सत्ता गाजवणे असा होत नाही, याचा कुठेतरी विसर पडत आहे.


मोलकरीण अचानक दोन दिवस न सांगता सुटी घेते. सहाजिकच गृहिणी वैतागते. पण दोन दिवसांनी कळतं की मोलकरणीच्या नवऱ्यांनं तिला मारहाण केली. दोन दिवसांपूर्वी घडलेलं सगळं विसरून ती तिच्या कामांना सुरवात करते. पुन्हा पुढच्या दहा-पंधरा दिवसांत पुन्हा एखादा दिवस तिच्या घरात असाच असतो. ती स्त्री जितकं सहन करते, तेवढंच तोडीचं नवऱ्याला उत्तरही देते आणि आपलं मन मोकळं करायला तिला कमीपणाही वाटत नाही. या उलट उच्चभ्रू कुटुंबांमधून दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार वाढत असताना बदनामी नको, शेजारी कळलं तर काय होईल, नातेवाईक नावे ठेवतील, आई-वडील पाठिशी उभे राहतील का, अशा अनेक कारणांमुळे या कुटुंबातील महिला व्यक्त होत नाहीत.

अशीच एक सत्य घटना.. एकाच घरातल्या दोन उच्चशिक्षित मुली. नोकरदार. स्वावलंबी. पण माहेरून पैसे आणण्यासाठी सासरी छळ होत असल्याने दोघी आई-वडिलांकडे आलेल्या. पालकही मुलींच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याऐवजी सासरी जाण्यासाठी आग्रही. अजूनही या मुली आपल्या निर्णयावर ठाम राहून नकार देऊ शकत नाहीत. मोकळेपणाने त्यांच्या अडचणींबद्दल पालकांशी बोलू शकत नाहीत किंवा पतीशी चर्चा करत नाहीत. दोन आठवड्यांपूर्वी अभिनेत्री युक्ता मुखी हिने देखील पतीकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आणि पुन्हा एकदा उच्चभ्रू कुटुंबातील स्त्रियांचा छळ हा विषय चर्चेत आला.
आपल्या देशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियाच अधिक कार्यक्षम, निष्ठावान, बुद्धिमान असतात, असे  विविध सर्वेक्षणांमधून सिद्ध झाले आहे. मात्र वास्तवात, पत्नीच्या क्रियाशीलतेला, क्रयशक्तीला आपल्या पुरुषी अहंकारांनी दाबून, कुस्करून टाकण्याचा प्रयत्न होतोय. तिचे स्वातंत्र्य, अस्तित्त्व, छंद यांवर बंधने येत आहेत. आवडी-निवडींना मुरड घातली जात आहे. पत्नीने आर्थिकतेत मदत करणे हा काही पुरुषांना अपमान वाटतो, याचा खेद आहे.

कुटुंब कोणत्याही स्तरातील असले तरी कौटुंबिक हिंसाचाराची कारणे फारशी वेगळी नाहीत. पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय, तिने पतीशी वाद घालू नये, तसे केल्यास अपशब्दांचा वापर, मुलाचा आग्रह धरणे, मुलीच्या जन्मावरून पत्नीला दोष देणे, लहान-मोठ्या कारणांसाठी माहेरून पैसे मागणे, स्वयंपाकावरून तक्रारी, मूल होऊ न शकल्यास टोचून बोलणे, पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न या सगळ्या कारणांबरोबर आता अलिकडे सोशल नेटवर्किंगवरील फ्रेंड्स सर्कल, पत्नीचा जुन्या मित्रांशी होणारा संपर्क, तिचा मोबाईल वारंवार पाहणे, संशय व्यक्त करणे अशा अनेक गोष्टींवरून पत्नीचा छळ केला जातो. वास्तविक पाहता या गोष्टी क्षुल्लक वाटतील किंवा शांतपणे चर्चेतून यावर तोडगा निघेल असे वाटेलही. पण याच गोष्टींवरून सतत बोलून तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. विनाकारण सतत ती अपराधी असल्याची भावना तिच्या मनात निर्माण केली जाते.

पावसानं झोडपलं आणि नवर्‍यानं मारलं तर दाद कुणाकडे मागायची.. स्त्रीचं नशीबच ते.. असं म्हणत नात्यांमध्ये काही वेळा हा पुरुषी अहंकार डोकाविण्यासही स्त्रिया कारणीभूत असू शकतात. अन्याय सहन कर, तू उलट बोलू नकोस, एकदा लग्न झाल्यावर माहेरी परत येऊ नकोस, थोडा त्रास सहन कर..संसारात हे चालतंच.. असे उपदेश मुलीला तिच्या माहेरून होत असतात आणि केवळ सहनशीलता हाच तिचा धर्म असल्याची मानसिकता तयार करीत असतात. याच ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार सहन करण्याला खतपाणी मिळत राहते. 

महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, धोंडो केशव कर्वे अशा अनेक समाजसुधारक पुरुषांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. मात्र, सध्याचा पुरूष ही बाब लक्षातच घेत नाही. अन्य कारणांसोबत व्यसन हे खूप मोठे कारण कौटुंबिक हिंसाचारात लक्षात घेतले पाहिजे. कॅज्युअली किंवा ऑकेजनली घेतले जाणारे ड्रिंक कधी व्यसन बनते, हे समजत नाही आणि त्याचे कुटुंबावर विपरित परिणाम होतात, असे अॅड. ज्योती सोरखडे म्हणतात.


सीमा शेख
(पूर्व प्रसिद्ध - म.टा. जुलै २०१३)

No comments: