आयुष्यातील एखाद्या पहाटे.. पं. शिवकुमार शर्मा यांच्यासारख्या प्रख्यात संतूर वादकाकडून आपल्यासाठी गुड मॉर्निंग शब्द येणं.. हा अनुभवच किती अविस्मरणीय आणि सुखावह असू शकतो हे केवळ २३ डिसेंबरची पहाट शिवजींच्या मैफलीत अनुभवणाऱ्यालाच समजू शकेल.
मी २२ डिसेंबरला संतूरवर राग चंद्रकंस वाजवायला सुरवात केली आणि २३ डिसेंबरला मी माझं वादन थांबवलंय. आता रात्रीचे बारा वाजून गेलेत. म्हणजे दुसरा दिवसही सुरू झालाय.. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू... असा अनपेक्षित योग आणि हे शब्दच इतके आनंद देणारे होते की, आता मी वादन थांबवू का, असं शिवजींनी विचारल्यावर सहाजकिच रसिकांमधून अनेक फर्माइशी पुढे आल्या. त्यातही राग पहाडीसाठी अधिक आग्रह होता आणि अखेर रसिकांवरील प्रेमाखातर त्यांनीही संतूर पहाडीच्या स्वरांशी जुळवून घेतलं आणि पुन्हा एकदा आपल्या जादूई हातांनी पहाडीच्या स्वरांमध्ये मंत्रमुग्ध केलं.
२०१२ संपत आलेलं असताना वर्षातली सर्वांत मोठी रात्र, अर्थात २२ डिसेंबर शिवजींच्या संतूरच्या साथीने व्यतीत व्हावा, यापेक्षा सोनेरी अनुभव दुसरा कोणताही नसेल. निसर्गाच्या सजीव आणि निर्जीव या व्याख्येनुसार निर्जीव असलेल्या या वाद्यातून अशक्षरशः स्वरांची निर्मिती करून त्यांना एकेक करून मांडणं, सादर करणं काय असतं.. आणि आपल्या हुकुमानुसार या स्वरांना नाचवणं, त्यांच्यात लय निर्माण करणं काय असतं ही जादू शिवजींच्या वादनातून अनुभवता आली. त्यांचं वादन सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे संतूरचे स्वर जुळवून घेताना निर्माण होणारा प्रत्येक झंकार मनात आनंदाची लहर निर्माण करीत होता आणि पडदा उघडल्यानंतर दिसलेली ती अद्वितीय, प्रसन्न मुद्रा स्वरझंकाराच्या प्रत्येक स्वराची, श्रुतीची पवित्रता स्पष्ट करीत होती.. हे स्वरांचं पावित्र्य टिकलं ते मैफलीतल्या अखेरच्या तरन्नूमपर्यंत.. त्यांची सुहास्य मुद्रा, स्वरांवरच नितांत प्रेम आणि वादनातली लयकारी पुढचे कित्येक दिवस मन ताजं, शांत ठेवायला आणि आयुष्यात सप्तस्वरांचे गुंजन सुरू राहण्यासाठी मदत करणारी ठरली..
सीमा शेख
२३ डिसेंबर, २०१२
सकाळी १०.१५
No comments:
Post a Comment