Wednesday, 28 November 2012

या जगण्यावर शतदा प्रेम करावे...


`ये होता तो अच्छा होता.. वो होता तो अच्छा होता..` असं म्हणण्यापेक्षा आयुष्यात जे मिळतंय, जे समोर येतंय त्या प्रत्येकावर मनापासून प्रेम का करू नये ? `मै. और मेरी तनहाई....अक्सर ये बाते करते है... तुम होती तो ऐसा होता.. तुम होती तो वैसा होता...` अशा प्रकारचे शब्द आणि रचना काव्य म्हणून खूपच अप्रतिम आहेत. पण यावर वास्तवात विचार करायचा तर अनपेक्षित गोष्ट आयुष्यात घडल्यानंतर त्यावर दुःख करत बसण्यापेक्षा ती गोष्ट आयुष्यात असतानाच तिच्यावर प्रेम करायला काय हरकत आहे ? आयुष्यात आतापर्यंत काही मिळालं नाही म्हणून खंत व्यक्त करण्याऐवजी जे मिळालंय त्यावर आपल्यापैकी कितीजण मनापासून प्रेम करतात ? मिळालेल्या गोष्टी आपल्या मानून त्यांची अनुभूती घेतात ? अशी माणसं खूप कमी असतात.. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी...

 आयुष्यातला प्रत्येक क्षण अळवावरच्या थेंबासारखा असतो. पानावरच्या दवबिंदू सारखा असतो. त्याचं आयुष्य फक्त क्षणिक. पानावर आहे तेवढेच क्षण. पानावरून गळून पडल्यावर त्या थेंबाचं महत्त्व आणि अस्तित्त्वच नाहीसं होतं. पण पानावर असताना त्याचं असणं आणि दिसणं टिपण्यासाठी आपण धडपडत असतो. तसेच आपल्या आयुष्यातले क्षण देखील. कालचा दिवस आजच्यासारखा नसतो, आजचा उद्यासारखा नाही आणि कल किसने देखा ? त्यामुळे येणारा प्रत्येकच दिवस आपल्यासाठी नवीन क्षण, नवीन अनुभव, नवीन व्यक्ती आयुष्यात घेऊन येत असतो. त्या प्रत्येकासाठी आपण आपल्यातलं पूर्णत्व दिलं तर ते क्षण नक्कीच दवबिंदूच्या सौंदर्यापेक्षा मौल्यवान ठरू शकतात. 

कौन बगेना करोडपती.. अर्थात केबीसीमध्ये नुकत्याच एका एपिसोडमध्ये घडलेला प्रसंग.. अमिताभ बच्चन त्यांच्यासमोर बसलेल्या स्पर्धकाशी काही गमतीशीर संवाद साधत होते. इतक्यात प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या त्या स्पर्धकाच्या पत्नीनं तो माधुरी दीक्षितचा मोठा फॅन असल्याचं सांगितलं. पत्नी म्हणाली, जेव्हा पासून माधुरी भारतात परत आली आहे, तेव्हापासून सगळे मिडल एज हसबण्ड बेचैन झालेत.. त्यावर अमिताभ म्हणाले, अहो, मिडल एज कशाला ? कित्येक तरूण अजूनही तिच्या प्रतीक्षेत आहे. पण मी सगळ्या तरुणांना सांगू इच्छितो की, माधुरी आता विवाहित आहे. त्यामुळे तुम्ही आशा सोडून द्या... असं म्हणतानाच काही क्षण विचार करून अमिताभ म्हणाले.. पण एक गोष्ट महत्त्वाची.. किसीको चाहने में क्या बुराई है ? जिंदगी में किसीसे प्यार करने में क्या बुरा है ?...

 ही वाक्यं त्या क्षणी अगदी सहज होती. पण त्यावर विचार केल्यावर लक्षात आलं.. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात.. एखादी व्यक्तीही असू शकते.. भले, एखाद्या नात्यात रुपांतर होऊ शकणार नसतं. पण त्यावर मनापासून प्रेम करणं तर कोणी हिरावून घेऊ शकत नाही ना ? पण अशा प्रेमाला एकतर्फी वगैरे सारखे टिपीकल शब्द वापरून प्रेम या शब्दाचा अपमान होईल, असे वाटते. कारण आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करणं ही अनुभूतीच वेगळी असते. त्यामुळे त्या व्यक्तीला समजो अथवा न समजो.. त्याच्यावर प्रेम करत राहणं.. यालाच जगण्यावर प्रेम करणं म्हणतात.  त्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण जगणं खूप महत्त्वाचं असतं. कारण, तो क्षण आयुष्यात पुन्हा अनुभवता येणार नाही, हे विसरता येणार नाही...मग तो प्रत्यक्ष भेटीतला असो वा अन्य कोणत्याही संपर्क माध्यमातला. त्याला जाणून घेणं, समजून घेणं.. कित्येकदा न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टीही आपण सहजपणे मान्य करू लागतो. आपण स्वतःसाठी कधी बदलण्याचा प्रयत्न करत नाही पण जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात येते तिच्यासाठी आयुष्यात आपोआप बदल होऊ लागतात. जगणं अधिक सुंदर करण्यासाठी आणि अधिक फुलविण्यासाठी हे प्रेमंच खूप मोठं माध्यम ठरू शकतं. 

सीमा शेख 

No comments: