Saturday, 17 November 2012

निसटते क्षण...


समुद्राच्या वाळूत खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मुठीमुठीने ती वाळू हातात घ्यायची, छोटंसं घर किंवा किल्ला करण्याचा प्रयत्न करायचा आणि जोरदार आलेल्या लाटेबरोबर हे सगळं वाहून गेलं तरी वाईट वाटून न घेता पुन्हा नव्याने ते घर तयार करण्याच्या मागे लागायचं. एकीकडे हातातून वाळू निसटत असते, काहीशी तळव्याला चिकटून राहते. प्रयत्न करूनही निघत नाही. त्यातले शिंपल्याचे कण तळव्याला टोचतातही पण वाळूत खेळण्याच्या आनंदात हे काही लक्षातच येत नाही. 

लहानपणी हा खेळ म्हणून खूप छान वाटतो. पण जसजसं आयुष्य कळत जातं, तसतसं हे आयुष्य सुद्धा या काहीसं निसटत्या वाळूसारखं, बेधडक येणाऱ्या लाटेसारखं, क्षणात वाहून जाणाऱ्या घरासारखं आणि बोचणाऱ्या वाळूच्या कणांसारखं, शिंपल्यांच्या तुकड्यांसारखंच असतं.  आपल्याला हवं म्हणून ते मऊसूत, हळूवार स्पर्शाचं कधीच नसतं. आयुष्यात अनेक क्षण असे येतात, जे मुठीत घट्ट पकडून ठेवावेसे वाटतात. मनातल्या खोल कप्प्यात कुठेतरी दडवून ठेवावेसे वाटतात. पण प्रत्येकवेळी ते शक्य नसतं ना... अर्थात क्षण दडपून ठेवल्यास ते दडपलेलेच राहतात आणि मुठीत घट्ट पकडलेले कधी हातातून निसटून जातात कळतही नाही.. आणि हे निसटते क्षण आयुष्यात अनुभवणं आणि ते पचवून पुढे जाणं किंवा सगळी परिस्थिती समजून घेऊन ते मान्य करण्यालाही खूप मोठ्ठं धैर्य लागतं.

या मुठीतल्या वाळूसारखंच आपलं आयुष्य. आयुष्यात खूप माणसं भेटतात. सगळीच काही आयुष्याच्या वाटेवर आपल्याबरोबर नसतात. काहीजण आपल्यासाठी चांगल्या दिवसांची सुरवात करून देतात, काहीजण हे दिवस चांगले निभावले जावेत म्हणून आपल्याला मदत करतात. आणि काहीजण हे प्रसंग पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ देतात. अर्थात अखेरपर्यंत साथ देणारी माणसं तशी लवकर भेटत नाहीत. बाकी अनेक आयुष्यात येतात आणि जातात. तरीही त्यातही काहींनी आपल्या आयुष्यात येणं हे खूप मोलाचं ठरतं. आयुष्याला आकार देणारं ठरतं. आणि अशीच माणसं मुठीतल्या वाळूसारखी चटकन आपल्या आयुष्यातूनही निसटून जातात. ती जात आहेत हे समजत असतं पण काही करता येत नाही. त्यांना थांबविता येत नाही आणि जाऊही देता येत नाही.. 
जसं एका ऊर्दू गझलकाराने म्हटलंय...
वो मेरे सामने ही गया और मै... 
रास्ते की तरह देखता रह गया..
आपको देखकर देखता रह गया...
अशा माणसांचं आपल्या आयुष्यात असणं हे आयुष्याला काही अर्थ प्राप्त करून देतं असं वाटतं. खूप काही शिकवून जाणारं, समजून घेणारं, समजून देणारं, चूक झाल्यास तितक्याच हक्कानं पण मैत्रीच्या नात्यानं सांगणं आणि स्माइल प्लीज असं म्हणून मनावरचं दडपण कमी करणारं हे व्यक्तीत्व आयुष्यात पुन्हा मिळत नसतं.. कधीच नाही...त्यामुळे त्याला मनाच्या कप्प्यात दडवून ठेवणं आणि पुढच्या आयुष्याला सामोरं जाणं.. याशिवाय पर्याय नसतो. अर्थातच उरलेल्या आयुष्यात या व्यक्तींच्या सहवासात लाभलेले क्षण पावलोपावली आठवतात, जुन्या दिवसांची आठवण करून देतात हे नक्की पण नव्याने जगण्याची उमेदही देतात...
सीमा शेख  
१७ नोव्हेंबर २०१२ (शनिवार)
रात्री - १०.३०


No comments: