विभक्त कुटुंब.. नोकरदार पालक.. आणि एकच मूल.. अशा परिस्थितीत प्रत्येक हट्ट पुरविला जाणे.. आणि कधीतरी ते अशक्य झाल्यास नकार पचविण्यास असमर्थ मूल.. त्यातून त्यांच्या टोकाच्या भूमिका.. वाढत जाणारे हे प्रमाण रोखण्यासाठी पालकांनीच जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलांचा हट्ट आणि त्याची गरज याचा मेळ घालत त्यांना समंजस करण्याची, सामाजिक जाण निर्माण करण्याची वेळ आली आहे.
टिव्ही पाहू दिला नाही म्हणून केलेली आत्महत्या, पार्टीला जाऊ दिले
नाही म्हणून घरात तोडफोड करण्याची वृत्ती, विविध कारणांसाठी पालकांना वेठीस धरणे असे
प्रकार घराघरात वाढत जात आहेत. गेल्या काही दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये लहान
मुलांपासून मोठ्यांपर्यंत आत्महत्येच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले आहे.
नकार पचविण्याची क्षमता राहिलेली नाही, आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची
क्षमता कमी होत चालली आहे, हेच या घटनांवरून स्पष्ट होत आहे. पालकांनी हट्ट पूर्ण केला
नाही, एखादी गोष्ट करण्यास नकार दिला की मुले अक्षरशः टोकाची भूमिका घेतात. प्रसंगी
स्वतःचे आयुष्य संपविण्यासही मागे-पुढे पाहात नाहीत. आयुष्याचा अर्थही अद्याप न उलगडलेल्या
या चिमुकल्यांना ते संपविणे खूप सोपे आणि अखेरचा पर्याय असल्यासारखे वाटू लागले आहे.
मात्र, कितीही कामाचा ताण असेल, आॅफिसचे टेन्शन असेल, पालकांचे आपसातले मतभेद असतील
तरी ते सगळे विसरून मुलांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण करणे, त्यांचा विश्वास संपादन
करणे खूप महत्त्वाचे झाले आहे.
पोषक वातावरणाचा अभाव
पूर्वी शाळेत शिक्षकांचा मुलांशी पुष्कळ संवाद होत असे. आता शिक्षकांना
सवडच मिळत नाही. घरात पालक वेळ देत नाहीत आणि शाळेत शिक्षकही नाहीत. त्यामुळे मुलांच्या
अपेक्षा किंवा फ्रस्ट्रेशन चुकीच्या मार्गाने बाहेर पडते. टीव्हीवर जे पाहतात, तसेच
बऱ्याचदा वागण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत पालकांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष
होत असते. त्यामुळे मुलांच्या एकटेपणावर इलाज सापडत नाही. याचा अर्थ नोकरदार महिलेने
काम सोडून घरात बसावे, असा होत नाही. पण नोकरदार महिलेला कुटुंबातून किंवा समाजातून
पुरेसा पाठिंबा न मिळण्याचेच हे परिणाम आहेत. या सगळ्यात मुले भरडली जातात. हा परिस्थितीचा
आणि सामाजिक वातावरणाचा दोष आहे. म्हणूनच चिल्लर पार्टीसारखी उदाहरणे दिसतात. मुलांनी
एकटे राहू नये, त्यांना योग्य वयात योग्य अॅक्टिव्हिटीज मिळाव्यात, मुलांशी संवादासाठी
आणि त्यांना समजून घेण्यासाठी पेरेंट्स एज्युकेशनही मिळाले पाहिजे… याची गांभीर्याने
कुठेही सोय नाही. काही पालक मुलांशी खूप कठोर वागतात. यातूनही मुलांना फ्रस्ट्रेशन
येते.
मूल वाढत असताना शाळा, घर, समाज याच्या जडणघडणीतून त्यांच्यावर संस्कार
होत असतात. पण आता हा भक्कम आधारच मुलांच्या आयुष्यातून नाहीसा होत आहे.
टीव्हीचे आकर्षण आणि दुष्परिणाम
लहानपणापासून भरवताना, स्वतः काम करताना मूल रडू नये म्हणून टीव्ही
लावायचा या सगळ्यामुळे कारण नसताना टीव्ही बघण्याची अतिरेकी सवय पालकच मुलांना लावतात.
यात मुळात पालकांचीच चूक आहे. टिव्हीवर आत्महत्या,
हिंसा या घटना सर्रास दिसतातच. या दुष्ट प्रवृत्तींचा मुलांवर परिणाम होतो. अकरा वर्षापर्यंतच्या
मुलांना खरे-खोटे काही कळत नाही. त्यामुळे कदाचित या गोष्टी करून बघण्याची उत्सुकता
मुलांमध्ये असते. जसे अभ्यासाचे वय होते तशी मुलांनी टीव्ही पाहू नये, अशी अपेक्षा
करतात. मग ते मुलांना टीव्हीच्या वेळा ठरवून देतात. परीक्षेच्या वेळी बंधने येतात.
मुलांचा हट्ट वाढतो, त्यातून त्यांना बाहेर काढणं अवघड जाते. एखाद्या गोष्टीपासून मुलांना
जेवढे परावृत्त केले जाईल, तेवढी त्याकडे मुले अधिक आकर्षित होतात.
मूल हट्टी का होते ?
नोकरी करणारे पालक असोत वा आई गृहिणी असो, मुळातच पालकांची स्ट्रेस
लेव्हल खूप वाढली आहे. त्यामुळे त्यांना अक्षरशः काही वेळासाठी मुलांपासून सुटका हवी
असते. या सगळ्यात पालक मुलांसाठी वेळ काढू शकत नाहीत. या ताणामुळे क्षणिक आनंद देणाऱ्या
गोष्टी मुलांना सतत विकत घेऊन देण्याचे प्रमाण वाढते. चाॅकलेट्स, कॅडबरी, गरज नसताना
घेतलेले एखादे खेळणे हे प्रमाण वाढत जातं. खरेतर, मुलांसाठी हे एकप्रकारचं अमिषंच असते.
`तू अभ्यास केलास तर खाऊ देईन, पाच मिनिटे शांत राहिलास तर चाॅकलेट देईन..` असे आपण
अगदी सहज बोलून जातो आणि याच गोष्टीची मुलांना सवय लागते. कालांतराने या गोष्टी वेळेवर
मिळाल्या नाहीत तर मुले हळूहळू हट्टाकडे वळतात. या सगळ्या प्रकारांची सुरवात ही पालकांचा
ताण, आॅफिसच्या कामातून येणारे फ्रस्ट्रेशन आणि त्यांच्याकडे मुलांसाठी नसलेला वेळ
यामुळे होत असते.
पालकांना काय करता येईल…
मुलांचा हट्ट टाळण्यासाठी पालकांनी त्यांना वेळ देणे खूप महत्त्वाचे
असते. मुलांच्या अपेक्षा खूप माफक असतात. आई-बाबांनी कौतुक करावे, कुठेतरी फिरायला
घेऊन जावे, लाड करावेत, अशीच मुलांची अपेक्षा असते. मुलांना कोणतेही खेळणे, चाॅकलेट
देणे याचा आनंद क्षणभंगूर असतो. पण या सगळ्या गोष्टी पालकांनाच योग्य वेळेत लक्षात
येत नाहीत आणि मग लहानपणापासून हे प्रमाण वाढत जाते. मूल आणि पालक या नात्यातील दरी
वाढते. आणि एक क्षण असा येतो, की मुलांच्या अपेक्षा इतक्या वाढतात की त्या पूर्ण करणे
पालकांना आर्थिक, मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या शक्य होत नसते. या सगळ्याचे पर्यवसान
या दोघांमधील नाते ताणले जाण्यात होते. त्यामुळे मूल आणि पालक यातील नाते दृढ हवे,
हाच यावर उपाय म्हणता येईल.
पालकांना एक गोष्ट विसरता येणार नाही की मुलाला जन्म दिलाय म्हणजे
त्याच्या वाढीसाठी आजूबाजूची परिस्थिती कशी असली पाहिजे, घराकडून मुलाला काय मिळाले
पाहिजे, पालक म्हणून कसे वागायला हवे, मुलाचे मन कसे ओळखायचे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येकजण
आपापल्या कामात आणि स्वतःच्या चक्रात व्यग्र आहे. पण समाजाच्या वर्तुळात मुलाला वाढविताना
आपले आणि मुलाचे जग मोठे कसे होईल, याचा पालकांनी विचार केला पाहिजे.
पालकांनी मुलांची गरज ओळखायला हवी. त्यानुसार मुलांच्या मागणीला
दाद द्यावी. गरजेनुसारच त्यांचे हट्ट पुरवावेत. मागच्या वेळी हट्ट केल्यावर एखादी वस्तू
दिली तर यावेळी अन्य एखादी वस्तू देणे कसे शक्य नाही, हे मुलांना समजावून सांगावे.
त्यांची गरज योग्य वेळी योग्यप्रकारे भागविली गेली तर हे नाते अधिक दृढ होते.
-
सीमा शेख


No comments:
Post a Comment