Saturday, 16 March 2013

पहिलं..वहिलं...

कोणतंही पहिलं वहिलं अविस्मरणीय असतं. कारण, ते एकदाच होत असतं. आणि म्हणूनच ते खूप स्पेशल असतं. त्या पहिल्यातून मिळणारा आनंद पुन्हा कधीच मिळू शकत नाही. मग ते पहिलं काहीही असो.. पहिलं प्रेम.. पहिला पाऊस.. सकाळचा वाफाळता पहिला चहा.. पहिलं घर.. पहिली कार.. पहिला विमान प्रवास.. पहिली नोकरी.. आणि बरंच काही..

आयुष्यात येणाऱ्या पहिल्या गोष्टीचा आनंदच खूप वेगळा असतो. आणि ही पहिली गोष्ट कधीच विसरता येत नसते. ऋतूमधला पहिला पाऊस पडून गेल्यानंतर येणारा मातीचा वास, गार हवा आणि प्रसन्न वातावरण हे पुन्हा पूर्ण पावसाळ्यात कधीच अनुभवता येत नाही. उलट पहिल्या पावसाची आपण जेवढी आतुरतेनं वाट पाहात असतो, त्याच्या उलट एकदा सुरू  झालेला पावसाळा कधी संपतोय, असं होत असतं. दिवसभरात कितीही चहा मिळाले तर दिवसातल्या पहिल्या चहाची सर कशालाच येत नही.

असंच एक मी अनुभवलेल्या पहिल्या..वहिल्याचं पर्व संपल.. आणि ते एक वर्ष झर्र्कन डोळ्यांसमोरून गेलें. आमच्या पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघानं एक वर्ष पूर्ण केलं आणि माझ्या अध्यक्षपदाचा कार्यकालही संपला. मागच्या वर्षी १६ मार्च २०१२ ला संघाची स्थापना झाली. हे अध्यक्षपद इच्छा नसताना, मला कोणतीही पूर्व कल्पना न देता माझ्या गळ्यात टाकलं गेलं होतं. अर्थात तो माझ्या मैत्रिणींचा माझ्यावरचा विश्वास होता आणि त्याच सगळ्या मैत्रिणींच्या मदतीमुळे हे एक वर्ष देखील खूप सहज पार पडलं. या पहिल्या वहिल्याचा माझा अनुभवही खूप छान होता. शहरात सुरू झालेला पहिला महिला संघ आणि त्याचं पहिलं अध्यक्षपद खूप अविस्मरणीय अनुभव होता. संघ स्थापन केल्यानंतर त्यातील सदस्यांना एकत्र आणणं हाच खूप मोठा अजेंडा माझ्यापुढे होता. कारण, आतापर्यंत केवळ कार्यक्रम आणि असाइन्मेंट्सच्या निमित्ताने भेटणाऱ्या आम्ही आता एक संघटना म्हणून एकत्र राहणार होतो.

चारजणी एकत्र आल्यावर बघू किती दिवस एकत्र राहतात, अशी शंकाही खूप जणांना होती. पण आमचं एकत्र येणं, संघासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणं आणि वर्ष पूर्ण करून दुसऱ्या वर्षाची कार्यकारिणी देखील जाहीर करणं हे सगळं त्या सगळ्यांसाठी उत्तर होतं. आमच्या पहिल्या संघाचं खूप जणांनी कौतुकही केलं, प्रोत्साहन दिलं. त्या सगळ्यांना शब्दात धन्यवाद म्हणायचे नाहीयेत, पण आम्ही नक्कीच त्यांच्या ऋणात राहू. आज म्हणता म्हणता वर्षं संपली आणि नवीन फळी तयारही झाली. पुढच्याही अनेक होतील आणि ही आमच्यासाठी सुरू केलेली चळवळही अशीच पुढेही सुरू राहील. यात सतत, नित्य नवीन मैत्रिणींची भर पडावी, आणि पंधरा जणींच्या सहभागाने लावलेल्या रोपट्याचा लवकरच वटवृक्ष व्हावा....

सीमा शेख
शनिवार, १६ मार्च २०१३  
सायं. ५.३०

No comments: