Friday, 25 January 2013

... पण तो दिसलाच नाही

बातमी मिळाली.. दिवस कारणी लागला.. खूप मुद्दे मनात साठवून परतीच्या मार्गावर निघाले.
बातमीच्यादृष्टीने मन समाधानी होतं. पण त्याला बघता आलं नाही, याची खंत अजूनही होती. असं वाटलं, पुन्हा स्पॉटवर जावं, कदाचित तो सापळ्यात अडकेल आणि मला पाहता येईल.. पण नाही. रात्री उशिरापर्यंत त्याच्यासाठी अनेकजण डोळ्यांत प्राण आणून बसले होते.. आणि त्याची चाहूलही लागत नव्हती..
बिबट्यापासून सुरक्षेसाठी रस्ता निर्मनु्ष्य करण्यात आला...

२५ जानेवारीची सकाळ.. दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनामुळे अंकात जाहिराती खूप असणार याची कल्पना होतीच. पण आज एकटीनेच काम सांभाळायचं, त्यामुळे कोणतीच स्टोरी मिस करून चालणार नव्हती. काय नवीन शोधावं, याचा विचार सुरू होताच. तितक्यात मेसेज वाजला. देहूरोडला बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी.. दिवसाचं सार्थक होणार हे यावरूनच समजलं. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट नाही म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. देहूरोडमधून आपल्या हद्दीत यायला त्याला वेळ लागणार नाही, याची जाणीव होतीच. त्यामुळे कसलाच विचार न करता स्पॉटवर जायचं ठरवलं.

डीएनएमधली माझी मैत्रीण अर्चना, हिला फोन केला आणि कव्हरेजसाठी निघायचा बेत पक्का झाला. दरम्यान, फोटोग्राफर सचिन स्पॉटच्या दिशेने निघालाच होता. देहूरोडजवळचं शेलारवाडी गाव. लोणावळा, तळेगाव या प्रवासात जाताना नजरेतून कितीदा सुटलेलं हे गाव. पण एका बिबट्याने या गावाला आज हिरो केलं होतं. अॅक्सिडेंटनंतर असाइन्मेंटसाठी माझ्या गाडीने खूप दिवसांनी इतक्या लांबचा पल्ला गाठला होता. दोन-तीन ठिकाणी विचारत आम्ही अखेर स्पॉटपर्यंत पोचणार, इतक्यात पोलिस आडवे आले. परत फिरा. इथून पुढे जाता येणार नाही. रस्ता बंद आहे. अखेर गळ्यात आय-कार्ड घालण्याची वेळ आली, हे समजून घेतलं. कार्ड घातलं तरी साहेबांचा आग्रह संपत नव्हता. गाडी लावून अर्धा किलोमीटर चालत जा, असं त्यांचं म्हणणं होतं. पण आमच्या दोघींच्या बुद्धीला वाटत होतं, की जर बिबट्या आमच्या दिशेनं आला तर किमान गाडीचा वेग आमच्या पायांपेक्षा निश्चित जास्त आहे. त्यामुळे आम्ही गाडी पुढे नेण्यावर अडून राहिलो. आमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही, असं पोलिसांनाच समजलं आणि आम्हाला अखेर परवानगी दिली.

पुन्हा पुढे गाड्यांचा ताफा, पोलिसांची फौज, मिलट्रीचे अधिकारी, ओबी व्हॅन्स आणि लाठ्या घेतलेले ग्रामस्थ. बातमीचा खरा फील आता आला. स्पॉटवरच्या दोनशे माणसात फक्त दोनच महिला. मी आणि अर्चना. लोकही आमच्याकडे आश्चर्याने  बघत होते. तुम्ही मुली असताना स्पॉटवर कशाला आलात, असंही काहींनी विचारलं. पण परिस्थितीचं गांभीर्य समजून आम्ही त्यावर दुरुत्तर करणं टाळलं. बिबट्या महिलांवर प्रथम अॅटॅक करतो, त्यामुळे तुम्ही लांब थांबा, असे सल्लेही तज्ज्ञांनी दिले. अर्थात हट्टी बिबट्यापुढे कुणाचीच डाळ शिजत नव्हती, हे समजून आम्ही स्टोरीचा दुसरा अँगल शोधायचा ठरवलं आणि पवना हॉस्पिटसच्या दिशेने गाडी वळविली. हॉस्पिटलमध्ये जखमी पेशंटजवळ आम्ही दोघीच. व्यवस्थित शुद्धीवर असलेला पेशंट. प्रेसवाले आम्हीच पहिले होतो. त्यामुळे त्यांनाही घटना सांगण्यात फार उत्साह होता. पुरेशी माहिती मिळाली. वन अधिकारी, प्राणीमित्र या सगळ्यांशी चर्चा झाली आणि अखेर समाधानकारक आणि सुविहित रिपोर्टिंग झाल्याच्या भावनेनं दोघी निघालो. पण लक्ष सगळं बिबट्याकडेच होतं. राहून राहून सतत वाटत होतं, बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचा एखादा फोन येईल आणि पुन्हा स्पॉवर जाता येईल. रात्री खूप उशीर झाला. तो काही माणसांच्या जाळ्यात अडकला नाही. कुठे गेला हे देखील समजले नाही. लहानपणापासून बिबट्या, वाघ अशा एखाद्या प्राण्याचा बछडा पाळायचा हे माझं स्वप्न होतं. ते अजूनही अपूर्णच. त्यामुळे आतापर्यंत वाघाच्या मावशीचेच (मांजर) खूप लाड केले. आणि पुन्हा एकदा तो न दिसल्याची खंत मनात ठेवून घरी परतले. कदाचित काही दिवस आनंदवनात जाऊन रहावं, तिथल्या बिबट्याशी मैत्री करावी, असा विचार आता मनात येतोय.

सीमा शेख
शुक्रवार, २५ जानेवारी २०१३
सायंकाळी ८.००

No comments: