नेहमीसारखाच बिझी दिवस सुरू झाला. मिटिंग, प्रेझेंटेशन, मार्केटिंग डील्स, कॉन्फरन्स... असं सगळं भलं मोठं शेड्युल त्याला डोळ्यासमोर दिसत होतं. सकाळी साडेआठ वाजता ब्रेकफर्स्ट टेबलवर असतानाच त्याचा मोबाईल वाजला. अर्थातच तिचा गुडमॉर्निंग मेसेज. टेक्स्टमधली तिची मिश्किल वाक्य, त्याचा दिवस छान जावा यासाठी लिहिलेला छोटासा जोक...हे सगळं वाचताना त्याच्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं. हलकंसं स्माइल करत त्याचे डोळे किलकिले झाले.. पण हे इथेच संपलं.. मेसेज वाचून त्यानं फोन बाजूला ठेवून दिला आणि पुन्हा स्वतःच्या कामात मग्न झाला. एखाद्या अपरिचित व्यक्तीचा मेसेज वाचून फोन बाजूला सारावा, अगदी तसंच.. कारण, त्याला त्याच्या कामाबद्दल जरा जास्तच आस्था होती आणि एकीकडे ती तिचा दिवस सुरू करत असताना त्याच्या रिप्लायची वाट पाहात कानात प्राण आणून बसलेली...
कधीतरी रिप्लाय करायला वेळ झाला नाही, तर समजून घेता येतं.. पण अलिकडे रोजच घडणारी ही गोष्ट तिला खटकत होती. थोडंतरी त्याच्याशी बोलावं, त्याचे प्रॉब्लेम्स आपण शेअर करावेत, असं तिला खूप वाटायचं..पण त्यानं त्याच्या आयुष्यात तिला एवढी स्पेस दिलीच नव्हती. प्रेम होतं पण कदाचित व्यक्त होण्यासाठी नव्हतं. मनात खोल कुठेतरी दडवून ठेवलेलं.. तिलाही न दाखविण्यासाठी. अखेर मेसेजला रिप्लाय येणार नाही, हे गृहीत धरून तिनं रूटीन सुरू केलं. घरातून बाहेर पडताना तिनं पुन्हा टेक्स्ट केला. `कसा आहेस, काय करतोयस, जेवलास का..?` वगैरे प्रश्न आणि `TC` लिहून send केला. तिच्या प्रश्नांची उत्तरं राहिली बाजूला, आणि ती उत्तरं देणं त्यानं कधी गांभीर्यानं घेतलंही नाही.. कारण, कदाचित तिच्या भावनांचा ओलावा त्याला समजलाच नव्हता. त्याने फक्त मोजकेच शब्द लिहिले. `in meeting...will call later..` हे शब्द पाहून निराश न होता, किमान एवढा निरोप देण्याची तसदी त्यानं घेतली हेच तिच्यासाठी समाधान. तिनं त्याच्याशी रोज गप्पा मारण्याची, रोज भेटण्याची, कुठेतरी फिरायला जाण्याची, त्याच्याबरोबर सिनेमा पाहण्याची अपेक्षाही कधीच केली नव्हती. तिला फक्त हवं होतं, त्याचं आपलेपण, त्याची मैत्री आणि त्याच्याकडून व्यक्त होणारं प्रेम...पण त्याच्याच शोधात तिची घालमेल होत होती.. फिर भी जिंदगी खूबसूरत है... असं म्हणत तिनं त्याच्याबद्दल कधीच तक्रार केली नाही.
ऑफिसमधून निघताना त्या दिवशी मात्र तिला त्याला भेटावंसं वाटलं. आतापर्यंत तिनं त्याच्या कामात कधीत डिस्टर्ब केलं नव्हतं. पण ती संध्याकाळ त्याच्या भेटीने संपावी आणि त्याच्याशी खूप मोकळेपणानं बोलावं असं तिला वाटत होतं. अर्थात न रहावून तिनं नंबर डायल केला.. रिंग वाजत राहिली पण रिप्लाय नाही..
बराच वेळ असंच झाल्यानंतर तिनं ऑफिसच्या रिसेप्शनवर फोन केला..
अर्थातच टिपिकल उत्तर मिळालं.. सर मिटिंमध्ये आहेत..आता बोलू शकणार नाहीत..
तिला अस्वस्थ वाटू लागलं.
तिनं पुन्हा मेसेज केला.. भेटायचं होतं.. तुझ्या आवडत्या कॉफी शॉपमध्ये वाट पाहू ? खूप दिवस गेलो नाही तिथं.. थोडं बोलायचंय..किती वेळ लागेल, मी वाट बघते...
तिच्या इनबॉक्समध्ये पुन्हा तेच मोजके शब्द येऊन आदळले.. `in meeting...will call later..`
आता मात्र, तिच्या भावनांचा बांध कोसळू लागला. नकळत डोळ्यातून एक-एक थेंब गालावर ओघळला. श्वासाचा वेग वाढू लागला. त्याची वाट पाहण्यासाठी आतुरलेले डोळे अश्रूंच्या थेंबांनी डबडबून गेले. सभोवतालची प्रत्येक गोष्ट तिच्याभोवती गरगर फिरत असल्याचं वाटू लागलं..चालायसाठी एक-एक पाऊल उचलणंही कठीण झालं होतं.. तरीही ती निघाली.. पार्किंगमधून स्वतःची गाडी काढायचंही भान तिला राहिलं नाही. ऑफिसच्या समोरून रस्ता जातोय तशी तिचीही पावलं चालत राहिली.. गेले अनेक दिवस दाबलेला हुंदका आज बाहेर पडला होता. अश्रू लपविण्यासाठी तिनं चेहऱ्यावरून स्कार्फ लपेटून घेतला मात्र, मनातला दुःखाचा आवेग काही केल्या थांबत नव्हता. डोक्यात विचारांची अनेक चक्रं थैमान घालत होती. या विचारांच्या वेगानं आता पावलं चालायला लागली. त्याच्या न येण्याचा राग नव्हता. मनात प्रेम अजूनही खूप होतं. पण त्यानं इतकं दुर्लक्ष करण्याची कारणं शोधण्याचा तिचा प्रयत्न होता. याबद्दलच थोडी खंतही होती..
याच चक्रात तिच्या मागे एका गाडीने करकचून ब्रेक दाबले.. रस्त्यावर जोरात टायर घासलं गेल्याचा आवाज झाला आणि नंतरचा आवाज फक्त तिच्या किंचाळण्याचा.. गर्दी जमली.. कोणीतरी रिक्षा बोलावली.. तिच्या जवळ पडलेला मोबाईल उचलला आणि तिला दवाखान्यात नेलं.. तिच्याबद्दल कळवावं म्हणून रिसेंट कॉल लिस्ट पाहिल्यावर त्याचाच नंबर पहिला दिसला.
पुन्हा त्याच्या मोबाईलवर तिचा फोन वारंवार वाजू लागला आणि तो डिस्कनेक्ट करू लागला. अखेर तिला दवाखान्यात नेणाऱ्यानं मेसेज केल.. Plz Call.. Its URGENT...
त्याला वाटलं, किती वेळा सांगितलं हिला वेळ नाहीये, तरी हट्ट सोडत नाही..
त्या मेसेजकडे त्यानं दुर्लक्ष केलं. रात्री घरी आल्यावर दिवसभराच्या कामातून तो इतका थकला, तिच्या मेसेजला उत्तर देण्याचं लक्षात न राहताच झोपून गेला...
आता मात्र सकाळी ब्रेकफर्स्ट टेबलवर बसल्यानंतर त्याला आठवण झाली. अजून गुड मॉर्निंग मेसेज आला नाही, असं म्हणत त्याचं लक्ष वारंवार मोबाइलकडे जाऊ लागलं. वेळ टळून गेली तरी तिचा मेसेज मात्र आला नाही. अखेर आता त्याला अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानं थेट तिचं घर गाठलं. तेव्हा घराभोवती जमलेली गर्दीच सगळं काही सांगून गेली...
ती गेली होती... कायमचीच... त्याची वाट पाहात थकलेले तिचे डोळे आता कायमचे मिटले होते.. पुन्हा कधीही न उघडण्यासाठी. त्याच्या डोळ्यांसमोरून झर्रकन कालचा दिवस गेला.. तिचे वारंवार येणारे मेसेज, फोन आणि त्या सगळ्याकडे याचं दुर्लक्ष...
आता उद्यापासून ना गुडमॉर्निंग मेसेज.. ना कॉफी...
खूप काही गमावलं त्यानं.. स्वतःच्याच वर्तुळात मग्न राहताना तिच्या भावनांची खोली कधी त्याला मापताच आली नाही.. तिच्या डोळ्यांत स्वतःला पाहण्यासाठी त्यानं वेळच दिला नाही..
पण आता वेळ संपली होती... कारण ती गेली होती...
सीमा शेख
शनिवार, १२ जानेवारी २०१३
दुपारी ४.००
3 comments:
मैत्री करणं सोपं असतं...ती टिकवणं अवघड असतं..
Heart touching Story mam.
Thank You Ajay..for reading this post.
Post a Comment