अचानक एक दिवस अॅक्सिडेंटली अनुष्का आणि अनिष एकमेकांसमोर आले. अर्थात ते एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होते. सुरवातीला काही दिवस अनिष तिला आपणहून नियमित भेटत होता. अशातच हळूहळू ओळख जास्त घट्ट होत गेली. त्यांच्या मनाची ओळख मनालाच पटली. दोघंही कदाचित आजपर्यंत ज्या मनाच्या शोधात होते, ते `मन` आज त्या दोघांच्याही समोर येऊन उभं राहिलं. `हीच ती...` जिच्या शोधात इतकी वर्षं होतो.. त्याला देखील हे वाटणं खूप सहाजिक होतं. कारण, अनुष्का होतीच तशी. अगदी त्याला साजेशी..
स्मार्ट पण तरीही साधी. परिस्थितीने सामान्यच पण मनाने खूप श्रीमंत... खूप बोलकी.. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचे डोळेच इतके बोलके होते की एखादी भावना शब्दांत व्यक्त नाही झाली, तरी तिला काय म्हणायचंय हे अनिषला नेहमीच कळायचं. अर्थात पण त्याने अनुष्काला हे कधी जाणवूच दिलं नाही. अनिष सुद्धा स्मार्ट, अभ्यासू चेहऱ्याचा, खूप समजूतदार आणि तिची नेहमीच काळजी घेणारा होता. दोघं भेटल्यावर हीच इतकी बोलायची की अनिष एका उत्तम श्रोत्याची भूमिका बजावण्याचं काम करायचा. ती जे काही सांगतेय ते अगदी पहिल्यांदाच ऐकल्यासारखं करायचा.. `बोल की काहीतरी`, असं तिनं म्हटल्यावर मग त्याच्या तोंडून मोजके शब्द बाहेर पडायचे. अर्थात त्याचा प्रत्येक शब्द अन् शब्द ती कानात साठवून ठेवायची, कारण तो बोलायचाच खूप इम्प्रेसिव्ह...तिला ते खूप आवडायचं.
आणि मग एकदा मधेच कधीतरी त्यांना वाटून गेलं, की आपल्या मनाला पटलेलीच ओळख बरोबर आहे. हे ओळखीचे धागे कुठेतरी खोलवर घट्ट होत गेले आणि एक दिवस हे मैत्रीचे धागे इतके घट्ट झाले की एकमेकांत गुंतून गेले. अनिषचं आपल्या आयुष्यात येणं अनुष्काला खूप महत्त्वाचं वाटू लागलं. कारण, ती आयुष्य जगत तर होतीच पण ते जास्तीत जास्त सुंदर करत जगायचं कसं, हे अनिषनं तिला शिकवलं होतं. ती तर प्रत्येक लहानात लहान गोष्टीत आनंद शोधायची पण मिळालेला आनंद जगायला त्यानं शिकवलं. तोच तिला नेहमी सांगायचा.. `जे आवडतंय ते कर.. पण फक्त मनापासून कर. जे करशील त्या वेळी त्या गोष्टीसाठी तुझे शंभर टक्के दिले पाहिजेस. कारण, तो क्षण तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. आज आपण भेटलो, उद्याचं माहीत नाही. म्हणूनच...आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपलंसं कर, आणि त्याचा अनुभव घे..` ती त्याचा शब्द अन् शब्द झेलायची आणि खरंच तो सांगायचा, तशी प्रत्येक गोष्टी करण्याचा भोळा प्रयत्नही करायची. कारण, तिनं मनापासून त्याला काही खास मानलं होतं.. अर्थात अनिषसाठीही ती त्याची खूप जवळची आणि खास मैत्रीण होती. पण त्यानं हे कधी तिला जाणवूही दिलं नाही.
अनिष आणि अनुष्का म्हणजे दोन समांतर रेषा होत्या. कधीच एकत्र न येऊ शकणाऱ्या पण कदाचित आयुष्यभर समांतर चालणाऱ्या.. आणि दोघांच्याही मनात कुठेतरी खोलवर याचीच खंत होती. अनुष्कानं त्याला एकदा विचारलं, आयुष्यात कधीच एकत्र येऊ न शकणारी माणसं एकमेकांना भेटतात तरी कशाला... यावर अनिषनं खास उत्तर दिलं होतं... तो म्हणाला होता, `कुछ सवाल ऐसे होते है, जिनके कोई जवाब नहीं होते..` हा असंच काहीतरी तात्विक उत्तर देणार हे तिलाही माहीतच होतं.
अशा कित्येक विषयांवर दोघंही तास अन् तास गप्पा मारायचे. अर्थातच चहा किंवा कॉफीची सोबत नेहमी असाचयीच. हळूहळू भेटण्याचं निमित्त कमी होत गेलं. पण किमान कधीतरी फोन, कधी एसएमएसचं साधन होतंच. पण का कोण जाणे, अचानक अनिषकडून ते मैत्रीचे धागे सैल पडत गेले. फोन बंद झाले. तिच्या एसएमएसला रिप्लाय येणंही थांबलं. अनुष्कानं मुठीत साठवलेली मैत्री हातातून निसटू लागली. तिनं त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला तिच्या एकाही प्रश्नाची दखल घेणं आवश्यक वाटलं नसावं. अर्थात तिला टाळण्याचाच प्रयत्न होता.. आणि अनुष्काचं मन मात्र या प्रश्नांच्या शोधात वणवण भटकतच राहिलं.. आणि मनात एकच विचार घोळत राहिला.. आपण दोघं समांतर रेषा होतो.. हे आपल्यालाही माहीत होतं. तरीही आपण मैत्री केली.. मग ती टिकवायची सोडून हा एक पाऊल मागे का सरकला.. हमने तो सिर्फ दूर रहने के लिए सोचा था...एक दूसरेसे दूर जाने के लिए तो नही कहा था ना.. मैने तो कभी ऐसा नहीं कहा था... या वाक्याचा शोध घ्यावा तितका कमीच होता..
सीमा शेख
२१ जानेवारी २०१३
दुपारी १.००
1 comment:
छान.
Post a Comment